कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक


पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिका कळंबोली प्रभाग क्रमांक ८ मधील के.एल.२ सेक्टर ५ परिसरात कचरा साचणे आणि ड्रेनेज लाईन बंद होण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक रामदास शेवाळे यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरसेवक शेवाळे यांनी केवळ आश्वासन देऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. “आश्वासनपूर्ती आणि प्रत्यक्ष काम” या भूमिकेची प्रचिती देत त्यांनी तत्काळ पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्येची माहिती दिली आणि त्वरित कारवाईचे निर्देश दिले.

त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता के.एल.२ परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. साचलेला कचरा तातडीने हटवण्यात आला असून बंद पडलेल्या ड्रेनेज लाईनची दुरुस्तीही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील अस्वच्छता कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या या भागात साफसफाई आणि ड्रेनेज दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक शेवाळे यांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक करत मनापासून आभार व्यक्त केले आहेत. या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील स्वच्छता सुधारण्यास मदत होणार असून भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नगरसेवक शेवाळे यांनीही नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
Comments