इस्कॉन नवी मुंबई खारघर येथे जन्माष्टमी निमित्त भव्य सोहळा
२३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा होणार
४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी, महिनाभर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पनवेल वैभव /प्रतिनिधी : -
खारघर येथील इस्कॉन नवी मुंबई – श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२६ निमित्त भव्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराचे अध्यक्ष डॉ. सुरदास यांच्या नेतृत्वाखाली २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहे.
१५ जानेवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अल्पावधीतच खारघरमधील हे मंदिर नवी मुंबईतील प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे.
२३ ऑगस्टपासून उत्सवाला सुरुवात
उत्सवाची सुरुवात २३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान झुलन यात्रेने होणार आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत कीर्तन, भजन आणि विशेष आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
२८ ऑगस्ट रोजी बलराम जयंती / बलराम पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
त्यानंतर २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान श्रावण उत्सव होणार असून, दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री ९ या वेळेत नामवंत वक्त्यांकडून श्रीकृष्ण कथा आणि आध्यात्मिक प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.
४ सप्टेंबरला जन्माष्टमीचा मुख्य सोहळा - ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य उत्सव होणार आहे. मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले राहणार असून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता कलश दात्यांसाठी विशेष कलश अभिषेक सुरू होईल. रात्री ११ वाजता महाअभिषेक, त्यानंतर मध्यरात्री महाआरती, उत्साहपूर्ण कीर्तन आणि प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
दाते आणि आजीवन सदस्यांसाठी सदस्यत्व कार्डच्या आधारे विशेष दर्शनासाठी प्राधान्यक्रमाच्या स्वतंत्र रांगा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
५ सप्टेंबरला श्रील प्रभुपादांचा १३०वा प्रकटदिन
५ सप्टेंबर रोजी इस्कॉनचे संस्थापक-आचार्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा १३०वा प्रकटदिन भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. सकाळची विशेष स्तुती, कलश अभिषेक आणि महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ७ सप्टेंबर रोजी परमपूज्य गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराज यांची व्यासपूजा, तर १९ सप्टेंबर रोजी राधाष्टमी साजरी करण्यात येणार आहे.
अवघ्या दीड वर्षात सामाजिक सेवेचा मोठा टप्पा
इस्कॉन नवी मुंबईने मंदिराच्या उद्घाटनापासून आध्यात्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत ८० लाख डोना प्रसाद तसेच २.५ लाख पोटभर जेवणाचे वितरण करण्यात आले आहे.
भक्तिवेदांत आयुर्वेदिक उपचार व संशोधन केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे उपक्रम सुरू करण्यात आले असून, टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या CTREC सोबत एकात्मिक रुग्णसेवेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे शिक्षण
शाळा, महाविद्यालये, भक्तिवेदांत महाविद्यालय आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे वर्ग देण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे.
याशिवाय विविध भागांत ५ भव्य जगन्नाथ रथयात्रा, तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग आणि गरजू नागरिकांमध्ये १ लाखांहून अधिक भगवद्गीता ग्रंथांचे वितरण करण्यात आले आहे.
दशावतार मंदिर आणि गोशाळाही आकर्षणाचे केंद्र
खारघर येथील इस्कॉन परिसरात दशावतार मंदिराचे उद्घाटन करण्यात आले असून, भगवान श्रीकृष्णाच्या विविध अवतारांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
तसेच देशी गायींच्या संरक्षणासाठी नवीन गोशाळेची सुरुवात करण्यात आली आहे.
युवकांसाठी विशेष उपक्रम
मुंबई आणि नवी मुंबईतील युवकांसाठी आतापर्यंत ७ युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, प्रेरणादायी वर्ग आणि प्रसादाच्या माध्यमातून युवकांना आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था
जन्माष्टमीला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थापन हे संस्थेचे प्रमुख प्राधान्य राहणार आहे. स्थानिक पोलीस, स्वयंसेवक, आरएसएस स्वयंसेवक, उत्सव समितीचे सदस्य आणि समाजसेवक यांच्या समन्वयातून गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मित्तल आणि सचिव राजेश तिवारी यांनी सांगितले.
डॉ. सुर दास यांचे आवाहन
“हा उत्सव केवळ मंदिरातील कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याची, श्रीकृष्ण कथा ऐकण्याची, पवित्र नामांचा जप करण्याची आणि प्रसाद ग्रहण करण्याची संधी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या अवताराचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि श्री श्री राधा मदनमोहनजींचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांनी कुटुंबीय व मित्रांसह सहभागी व्हावे,” असे आवाहन इस्कॉन नवी मुंबई, खारघरचे अध्यक्ष डॉ. सुरादास यांनी केले.
कार्यक्रम संपर्क : +९१ २२ ३५०७०७१२
ई-मेल : iskcon.kharghar@gmail.com
वेबसाईट : www.iskcon-navimumbai.org