विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का?
महेंद्रशेठ घरत यांचा दिबांना अभिवादन, सरकारला सवाल
उलवे, ता. २४ : लोकनेते दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले. देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत. उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यांचे ते प्रणेते आहेत. त्या आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. त्यामुळे यांची जाण ठेवून तरी विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे. म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार, असे रोखठोक मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दिबांना स्मरण करताना व्यक्त केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना महेंद्र शेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता आहे. तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये, असे मतही महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता. २४) लोकनेते दिबांना सकाळी ९ वाजता जासई येथे अभिवादन केले. यावेळी दिबांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण केले.
त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगला येथे दिबांना अभिवादन केले. यावेळी दिबांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी अतुल पाटील, मनीषा पाटील आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.