११ वर्षांत भारताचा ऐतिहासिक कायापालट : नेतृत्व, तंत्रज्ञान आणि जनभागीदारीचे यश
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (हरेश साठे) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे. त्यामुळे देशाने ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से सिद्धी’ या मंत्रांचा अंगीकार करत ऐतिहासिक परिवर्तनाचा काळ अनुभवला आहे. हा कार्यकाळ भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १२ ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ११ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि त्या अनुषंगाने सरकारने देशवासियांसाठी केलेले योजना, निर्णय, उपक्रमांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल पश्चिम मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, सुनील पाटील, यतीन पाटील, विश्वजित पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना माहिती देताना पुढे सांगितले कि, नेतृत्व आणि जनभागीदारीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांसोबत देशाच्या परिवर्तनाचा प्रवास केला आहे. २०१४ पूर्वी जे अशक्य वाटत होते, ते आज शक्य झाले आहे. यामागे निर्धार, पारदर्शकता, आणि परिणामकारक धोरणांची अमलबजावणी महत्वाचे ठरले आहे. सेवा आणि सुशासन हा एक नवा दृष्टिकोन घेत मोदी सरकारने शासन म्हणजे "सेवा" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सुशासनाला संस्कृती म्हणून स्वीकारले असून तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांची हमी दिली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डीबीटी प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्याचबरोबरीने जीएसटीमुळे करव्यवस्थेतील सुसूत्रता वाढली आणि भ्रष्टाचाराला आळा बसला.तसेच कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा असलेला बंध अधिक दृढ करण्यात आला. गरीब कल्याणासाठी प्राथमिकता आणि कृती करण्यात आली. गरीब कल्याण हे मोदी सरकारच्या धोरणांचा केंद्रबिंदू राहिला आहे. अनेक योजना राबवून सामान्य माणसाच्या जीवनमानात परिवर्तन घडवून आणले गेले आहे. आयुष्मान भारत योजना ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना स्वयंपाकाच्या गॅससाठी मोफत कनेक्शन, जनधन योजना बँकिंग सेवांचा सर्वसामान्यांपर्यंत विस्तार, पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, किसान सन्मान निधी अशा विविध योजना गरीब, ग्रामीण व शेतकरी समाजासाठी प्रभावी उपक्रम ठरले आहेत.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, एका बाजूला सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून काम करतानाच राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णताही सिद्ध केली आहे. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताच्या शौर्याची प्रचिती जगाला झाली. शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र भारतात बनवले गेले.' मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण उत्पादनांची देशांतर्गत निर्मिती व निर्यात वाढली. सरकारची संपूर्ण ताकद सैन्याला देण्यात आले तसेच दहशतवाद्यांना त्यांच्या देशात घुसून दिलेलं उत्तर भारताच्या निर्धाराचे प्रतीक बनले आहे. आर्थिक प्रगती आणि जागतिक स्थान लक्षात घेता २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात १० व्या क्रमांकावर होती. आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, आणि तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आयातऐवजी निर्यातीमध्ये वाढ करत देशाचा विकास अधिक होत आहे. त्याचबरोबरीने मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडियासारखे उपक्रम राबवत आपला भारत देश आत्मनिर्भर झाला आहे, आणि हि बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगत आपला भारत समृद्ध तर होतच आहे पण त्याचबरोबरीने संरक्षण सामर्थ्यवानही बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले. या काळात संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे कार्यही चांगल्याप्रकारे झाले आहे. राम मंदिर निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर अशा विविध उपक्रमांतून सांस्कृतिक पुनरुत्थानाला चालना देण्याबरोबरच आधुनिकतेसह भारताची संस्कृती व परंपरा यांचे जतन करण्याचे कामही या निमित्ताने झाले असून मोदी सरकारचा कार्यकाळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या स्तंभांवर आधारलेला आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार, पारदर्शक प्रशासन, तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वसमावेशक विकास ही वैशिष्ट्ये या कालखंडात ठळकपणे दिसून आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता १४० कोटी भारतीयांना दिले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राने भारताने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत, असे सांगत जगात सर्व क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्याचे काम कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित करत मोदी सरकारच्या कार्याची माहिती देऊन लोककल्याणकारी निर्णयांबद्दल आभारही व्यक्त केले.
चौकट -
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरवर केलेल्या बेताल व्यक्तवावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या व्यक्तवाचा निषेध व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूर हि देशाच्या सैन्यांची विजयीगाथा असताना “ऑपरेशन सिंदूर एक लहान मुलांचा कंप्युटर व्हिडिओ गेम” असे व्यक्त करणे म्हणजे देशातील जवानांचा अपमान आहे, देशाच्या सैन्याचा अपमान जनता कधीच सहन करणार नाही, त्यामुळे जनतेनेही नाना पटोलेंचा धिक्कार केला पाहिजे.