कर्नाळा खिंडीत खासगी बसचा अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू
बस चालकाला अटक; निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल...
जखमींची आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली भेट..
पनवेल(प्रतिनिधी) कर्नाळा खिंडीत रविवारी (दि. ४ मे) उशिरा रात्री कर्नाळा खिंडीत खाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली. ओमकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण ४९ प्रवासी होते. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर आहे. अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. ५ मे) सकाळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. तसेच अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले. अपघातप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असून, चालकावर निष्काळजीपणामुळे मृत्यू व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळाली असून, अपघात घडवून फरार झालेल्या खाजगी बसचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या दुर्घटनेत एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून, १४ प्रवासी सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन प्रवशांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ओमकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री ११ वाजता उलटली होती. अपघातानंतर चालक पळून गेला होता. मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला आज सकाळी अटक करण्यात आली. अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले.