पनवेल रेल्वे स्थानकातील समस्या मार्गी लावण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी ...
पनवेल रेल्वे स्थानकातील समस्या मार्गी लावण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी 

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.  नामदार आश्विनी वैष्णव रेल्वेच्या महत्वपूर्ण स्थानकांना भेट देत असून त्यांनी आज पनवेल रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री महोदयांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन पनवेल रेल्वे स्थानकातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.  

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि,  पनवेल हे शहर रस्ते, परिवहन आणि रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि गतीशील केंद्र ठरले आहे. याची भौगोलिक व सामाजिक रचना लक्षात घेता, पनवेल हे "मुंबईचे प्रवेशद्वार" मानणे उचित ठरेल.कोकण रेल्वे, मुंबई–नवी मुंबईकडे येण्या जाणाऱ्या रेल्वे सेवा, पुणे मार्गावरील गाड्यांसाठी पनवेल एक अत्यंत महत्त्वाचा जंक्शन स्टेशन बनले आहे. याशिवाय पनवेल जवळील उलवे–द्रोणागिरी नोडमध्ये होत असलेला झपाट्याने विकास, नुकतेच सुरू झालेले अटल सेतू, जेएनपीटी तसेच लवकरच कार्यान्वित होणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  या सर्व बाबीमुळे या परिसरात व्यापारी वसाहत व लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पनवेल रेल्वे स्थानकाचा अत्याधुनिक स्वरूपात विकास करणे व प्रवाशांच्या सुविधेसाठी आवश्यक उपाययोजना करणे हे अत्यंत गरजेचे असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि चार मधील सबवेला नवीन पनवेल (पूर्व) पर्यंत वाढवणे, सध्याचा फूट ओव्हर ब्रिज लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा असून, त्याऐवजी नवीन व अधिक रुंद एफओबी  उभारणे गरजेचे आहे. पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूस पार्किंग डेकचे काम अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे वाहतूक कोंडी व पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. हे काम तातडीने पूर्ण करावे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक्सलेटर आणि दिव्यांग, वृद्ध व गरोदर महिलांसाठी लिफ्ट्स उपलब्ध करणे आवश्यक आहे. रेल्वे स्टेशनची इमारत अत्यंत धीम्या गतीने उभी राहात आहे, त्यामुळे या कामास फास्ट ट्रॅकवर नेण्याची गरज आहे. हार्बर लाइन, मुख्य लाइन व लोकल रेल्वे लाईन यामधील इंटरकनेक्शन लूप तयार करणे गरजेचे आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकणार आहे.  पनवेल रेल्वे स्टेशनाला जरी ‘अ’ दर्जा प्राप्त असला, तरी येथे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या सर्व गोष्टींवर तातडीने कृती करण्यात यावी, आणि त्यासाठी या विषयाकडे आपण वैयक्तिक लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात यावी, अशी विनंती आमदार प्रशांत ठाकूर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
Comments