लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार
सातारा (हरेश साठे) रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ०२ कोटी १२ लाख रुपयांची देणगी दिली असून त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे कर्मवीर भूमीत जाहीर हृद्य सत्कार करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांचा ६६ वा पुण्यतिथी कार्यक्रम सातारा येथे समाधी परिसरात संपन्न झाला. यावेळी कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या समाधीला अभिवादन करून हा समारंभ पार पडला.
आपल्याकडील पैशांचा दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. रयत शिक्षण संस्थेचे ते माजी विद्यार्थी. ‘कमवा आणि शिका’ योजनेत त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी शिक्षक म्हणूनही संस्थेत सेवा केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शहरांसोबतच आदिवासी व ग्रामीण भागातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखांना वेळोवेळी गरजेनुसार उदार हस्ते मदत केली. संस्थेच्या गरजांवर तातडीने प्रतिसाद देण्याचे त्यांचे कार्य सतत सुरू असते. कर्मवीर अण्णांनी तळागाळात शिक्षणाची गंगा निर्माण केली. त्यांचे कार्य निरंतर सुरू राहिले पाहिजे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर अग्रेसर राहिले आहेत आणि तो वारसा ते चालवत आहेत. स्वतःची “जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था” असूनही, त्यांनी रयत संस्थेला मातृसंस्था मानून रयत शिक्षण संस्थेच्या मदतीला स्वतःला झोकून देत रयतला खंबीर साथ दिली आहे.संस्थेने सांगायचे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ताबडतोब अमंलबजावणी करायची हे समिकरण चालत आले आहे. "मळलेल्या वाटेने कोणीही जातो, पण न मळलेल्या वाटेने जाणारेच इतिहास घडवतात", त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाड्या सारख्या अत्यंत दुर्गम भागात शिक्षणाची पंढरी उभी करत शिक्षणाची उंची निर्माण केली आहे. त्यांच्या दानातून अनेक शाखा उभारल्या आणि त्यामुळे हजारोंच्या नाही तर लाखोच्या संख्येत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत आहे. कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजाचा विचार करत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज संस्थेच्या साडेसातशेहून अधिक शाखांमधून साडेचार लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या आणि पर्यायाने तळागाळातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कर्मवीर अण्णांचे कार्य पुढे घेऊन जाणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाचे योगदान कायम अनमोल राहिले आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी देणगी रूपाने विशेष योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, व्हॉईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आशुतोष काळे, रोहित पवार, चेतन तुपे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष गौरव फुटाणे, संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे, अरुण कडू पाटील, जयश्री चौगुले, सरोजमाई पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू म्हस्के, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, संजीव पाटील, ज्योत्स्ना ठाकूर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक विकास करून समाजाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या संस्थेच्या विविध शाखांना 'कर्मवीर पारितोषिक' देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा 'यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय क्रीडा क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा आपल्या मनोगतातून विशद केला.
कोट -
रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून कर्मवीर अण्णांनी सामान्य कुटुंबातील मुलामुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्याचबरोबरीने संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी ज्ञानदान करणारे मोठे कुटुंब निर्माण केले. अण्णांच्या आशीर्वादाने संस्था उत्तरोत्तर प्रभावी काम करत आहे. - खासदार शरद पवार
-------------------------