दारूमुक्त खारघरसाठी निर्धार ...
दारूमुक्त खारघरसाठी निर्धार   ...


पनवेल(प्रतिनिधी) खारघर शहर दारूमुक्त व्हावे, यासाठी सहयोग सेवाभावी संस्था आणि खारघरमधील नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या अंतर्गत रविवारी खारघरमध्ये सांकेतिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि दारूमुक्त खारघरसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
     राज्य शासनाने खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे, यासाठी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. २००७ पासून मोर्चे, आंदोलने आणि शासनाकडे पत्रव्यवहार समितीने केले आहेत. याच मागणीसाठी १८ मे रोजी खारघरमधील शिल्प चौकात एकदिवसीय सांकेतिक उपोषण आयोजित करण्यात आले होते, ज्याला खारघरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खारघर शहराला दारूमुक्त करण्याची मागणी येथील नागरिक मागील दोन दशकांपासून करत आहेत. मात्र, उत्पादन शुल्क विभाग लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून दारू विक्रीचे परवाने वाटप करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी  भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, ऍड. नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे, वासुदेव पाटील, समीर कदम, युवा मोर्चा अध्यक्ष  नितेश पाटील, अमर उपाध्याय, यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
Comments