गुन्ह्यातील गाडी घेऊन पसार झालेला आरोपी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात ...
गुन्ह्यातील गाडी घेऊन पसार झालेल्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात ...


पनवेल वैभव दि.१० (संजय कदम) : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एका गुन्ह्यासंदर्भात ताब्यात असलेली गाडी दुसऱ्या चावीद्वारे सुरु करून त्या गाडीसह तो फरार झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात या विभागाकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने सदर आरोपीला मोखई, शिरूर परिसरातून ताब्यात घेतले आहे. 
साधारण वर्षभरापूर्वी राज्य  उत्पादन शुल्क विभागाने ४१९ किलो गांजासह दहा लाख रुपये किमतीची एक्सयुवी ७०० हि गाडी आरोपी आकाश चव्हाण (वय २८) याच्यासह ताब्यात घेतली होती. सदर गुन्ह्यातील आरोपीने हि गाडी पुणे येथून भाड्याने घेतली होती. हि गाडी संबंधित विभागाकडे ताब्यात असल्याचे पाहून त्याने पुणे येथून गाडीची दुसरी चावी आणून रात्रीच्या वेळी गुन्ह्यातील गाडीसह पळून गेला. याबाबतची तक्रार पनवेल शहरे पोलीस ठाण्यात दाखल होताच व पोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक पवार, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, अविनाश गंथाडे, अमोल डोईफोडे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने शोध सुरु करत गाडी पुणे येथून आरोपीच्या नातेवाईकांच्या कडून ताब्यात घेतली. परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश चव्हाण याचा पत्ता लागत नव्हता अधिक शोध घेत असताना पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि सदर आरोपी हा त्यांच्या गावातील गाव कप क्रिक्रेट स्पर्धेत मॅच खेळण्यासाठी काशीचा माळ येथे सहभागी होणार आहे. व त्याचा जर्सी नंबर ३१ असल्याचे सांगितले. त्यानुसार या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. आरोपीला पोलीस आल्याचा सुगाव लागल्याने तो क्रिकेट मैदान सोडून पळू लागला परंतु पोलीस हवालदार परेश म्हात्रे याने त्याचा पाठलाग केला. मात्र झटापटीत परेश म्हात्रे जखमी झाले. परंतु त्या स्थितीत हि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. सदर आरोपीला पनवेलमध्ये आणुन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोउनि विनोद लभडे करीत आहेत.        
फोटो : आरोपी आकाश चव्हाण
Comments