दिबांचे जाज्वल्य विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत - महेंद्रशेठ घरत...
दिबांचे जाज्वल्य विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत - महेंद्रशेठ घरत

जासई, ता. १३ ः आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे. दिबांसारखे निःस्वार्थी नेते अलीकडच्या राजकारणात नाहीत, दिबांमुळेच नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांना काहीअंशी न्याय मिळाला आहे. दिबांमुळेच साडेबारा टक्के जमिनीचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे. दिबांनी अॅम्बुलन्समध्ये सलाईन लावली असतानासुद्धा आंदोलनात उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर राहिले. अशा निःस्वार्थी नेत्याचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, असे आवाहन महेंद्रशेठ घरत यांनी जासई येथे केले. 
जासई हायस्कूलमध्ये दिबांच्या 99 व्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत बोलत होते. त्यांनी दिबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जासई हायस्कूलच्या काही समस्या आहेत, त्यांची माहिती प्राचार्य आणि हायस्कूलच्या पदाधिकाऱ्यांकडून ऐकून घेऊन त्या समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असे महेंद्रशेठ घरत यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. वेळ पडल्यास सिडकोबरोबर संघर्ष करू, पण हायस्कूलला आवश्यक तो निधी मिळालाच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे, असेही ते म्हणाले.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज जासईचे प्राचार्य कोंगेरे सर, नरेश घरत माजी सभापती पंचायत समिती उरण, अरुण जगे चेरमन स्थानिक स्कूल कमिटी जासई, दशरथ ठाकूर, संजय ठाकूर, रमेश पाटील, रघुनाथ ठाकूर(तात्या ), माजी सरपंच श्रीमती रजनी घरत, माजी सरपंच निराबाई म्हात्रे, वंदना म्हात्रे, आदित्य घरत, यशवंत घरत, सुभाष घरत, तसेच
 सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments