'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा...
पनवेल (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील 'रामबाग' या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात रविवारी सायंकाळी साजरा झाला.
नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते. आणि त्यातच पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली 'रामबाग' हि वास्तू न्हावे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पनवेल, उरण, रायगड नवी मुंबईसाठी अभिमानाची ठरली आहे, विशेष म्हणजे 'रामबाग' आता पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे न्हावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि म्हसेश्वर मंदिर समितीच्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. तसेच विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि पुन्हा एकदा विजयी मिळविले आमदार महेश बालदी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, सरपंच विजेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री. सत्यनारायण महापूजेचे हजारो नागरिकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पंचम निर्मित व गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि सोबत ७० कलाकारांचा संच असलेला 'महाराष्ट्राचे आम्ही मराठी' या पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली होती.
रामबागला भेट देणाऱ्यांना समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद दिसतो. न्हावेखाडीत रामबागच्या रूपाने कमळ उमलले आणि याचा उपयॊग संपूर्ण परिसराला होत असून त्यामुळे या परिसराला आणखी एक चांगली ओळख मिळाली. राज्यातून विविध भागातील लोकं या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. अनेक उद्यानांना प्रवेश फी आकारली जाते मात्र रामबागेत प्रवेश विनाशुल्क आहे. या ठिकाणी प्रवेश मोफत असले तरी सुविधा मात्र दर्जेदार आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी 'स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग' म्हणून ओळखली जात आहे. १४ एकर जागेतील या 'रामबाग' उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ती संख्या दोन वर्षात लाखांच्या पार गेली आहे. कौटुंबिक, तसेच विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवाणीमुळे निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी घेता येत आहे. तसेच विद्यमान व पुढील पिढीला सुंदर वास्तू आणि मोकळ्या हवेत आणण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला रामबागच्या रूपाने हि एक चांगली पर्यटन वास्तू मिळाल्यामुळे या विभागाचे नाव मोठे झाले आहे.
वर्धापनदिनानिमित्त झालेल्या या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माझगाव डॉकचे जीएम श्री. सांळुखे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, चिंतामण घरत, रामदास ठाकूर, न्हावे उपसरपंच शैलेश पाटील, गव्हाण उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिले, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका सुशीला घरत, दर्शना भोईर, प्रमिला पाटील, कल्पना ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, मदन ठाकूर, हरेश्वर कडू, प्रकाश कडू, अरुणशेठ ठाकूर, वैभव म्हात्रे, अमर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ठाकूर कुटुंबिय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर, रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी स्वप्निल ठाकूर यांनी स्वागतपर भाषण करत रामबाग निर्मितीच्या मागील उद्दिष्ट विशद केले. हे उद्यान न्हावे पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अभिमानास्पद पर्यावरणप्रेमी स्थळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
परिसरामध्ये अपेक्षित विकास घडवण्यासाठी काम करत राहू- आमदार प्रशांत ठाकूर
सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या म्हसेश्वर देवस्थान कमिटीच्या माध्यमातून हा आपला सगळा परिसर सुशोभित झाला. गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना अभिमान वाटणार अशा पद्धतीत एक सौंदर्य स्थळ पर्यटन स्थळ ठरलेला आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी म्हंटले. तसेच रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कमिटीच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले कि, आज या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या या रामबाग परिसराला पाहता पाहता दोन वर्ष झाले आहेत आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जण एकमेकांशी अधिकाधिक जोडले जातोय. या ठिकाणी होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आता रामबागची एक खास वेगळी अशी ओळख बनत चाललेली आहे त्यामुळे हा परिसर आपल्या उलवा परिसराचा नाही तर एका अर्थानं पनवेल तालुक्याची शान बनत चाललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांचा आनंद हा अधिकाधिक वाढला आहे. वेगवेगळ्या मार्गाने या परिसराच्या विकासासाठी कैलासवासी जनार्दन भगत साहेब यांच्यापासून प्रेरणा घेत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी काम करतो. स्थानिक ग्रामस्थ इथला शेतकरी आहे या स्थानिक ग्रामस्थाला, शेतकऱ्याला अभिमानाने इथं या ठिकाणी आपल्या जीवन जगता आलं पाहिजे पुढच्या पिढीला त्यांना चांगल्या पद्धतीने इथे विकासाचा होतोय त्या विकासामध्ये महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे यासाठी जे जे करण आवश्यक आहे ते करण्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करतो. मग इथे विमानतळ येतोय इथे जेएनपीटीचे चार चार पोर्ट्स आलेले आहेत किंवा या परिसराचा होणारा हा जो विकास आहे याच्यामध्ये विकासाच्या रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होतात आणि त्यामुळे या नव्याने निर्माण होणाऱ्या या संधी आपल्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत, आपल्या परिसरात राहणारा ग्रामस्थ नवयुवक नव तरुण हा कुठल्याही स्थितीमध्ये रोजगारासाठी त्याला इथून कुठे जावा लागू नये. पनवेल तालुका असेल या परिसरामध्ये देशभरामधून वेगवेगळे तरुण आपल्या नशीब आजमावण्यासाठी मुंबई, नव्या मुंबईत येतात आपल्या परिसरात येऊन स्थायिक होत आहेत तेव्हा देशभरातून जेव्हा लोक इथे येतात आणि या ठिकाणी आपलं कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न करताय त्या इथल्या स्थानिकांना सुद्धा आपलं कर्तृत्व इथं गाजवला पाहिजे यासाठी त्याला संधी निर्माण करणे राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. याच बरोबरीने त्याला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे याच्यासाठी त्या शिक्षणाच्या चांगल्या संधी या परिसरात निर्माण करणे ही सुद्धा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या परिसरामध्ये काम करत असताना ज्या व्यासपीठावर देखील आपण पहात राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून सर्वजण जेव्हा या ठिकाणी एकत्र येतो तेव्हा या परिसराचा विकास हा ध्यास आपण मनापुढे ठेवून डोळ्यापुढे ठेवून ते काम करत राहिलेलो आहोत आणि त्यामुळे पुढे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमदार म्हणून मी , आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील आम्हां तिघांची ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी लक्षात घेत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने पार पडत राहू हि ग्वाही या सत्काराच्या निमित्ताने देत आहे. आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचा जो सत्कार झाला त्या सत्काराचं उतराई होऊ शकत नाही पण त्या सत्काराला या परिसरासाठी अधिकाधिक काम करून आणि उत्तर देत राहू असं वचन या निमित्ताने आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना ज्यांनी निवडून दिलं त्या सर्वसामान्य जनतेला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देऊन त्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करत राहू. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रचंड वेगाने बदलतोय आपला परिसर सुद्धा बदलत असताना त्या परिसरामध्ये आपल्याला अपेक्षित विकास घडवण्यासाठी आम्ही काम करत राहू, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.