आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर ...
आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार - लोकनेते रामशेठ ठाकूर 


पनवेल (हरेश साठे) आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. 
        आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. त्यांनी यावेळी बोलताना सर्वांचे आभारही मानले. पनवेल विधानसभेचे नेतृत्व करताना आमदार प्रशांत ठाकूर जबाबदारीने काम करत आहेत, त्यामुळे वडील म्हणून आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
           लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः हे देशाच्या विकासाचे मूळ उद्दिष्ट्य घेऊन काम करत आहे. आणि त्या विचारधारणेतून आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच काम करतात. सर्वसामान्यांचा विचार त्यांच्या कार्यातून दिसत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदार संघाचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्यांनी कायम उचलली आहे. आणि त्यावर ते खरे उतरले आहेत. प्रत्येक समाजातील वर्ग आमदार प्रशांत ठाकूर यांना मानतो त्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकीने नाळ जोडली गेली आहे. आमदार प्रशांत ठाकूर पनवेलच्या विकासासाठी सतत काम करीत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःला या कार्यात झोकून दिले आहे. चारवेळा निवडून येणे हे सहज नसते. लोकांची कामे केल्यानंतरच हे यश मिळत असते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. आमदार प्रशांत ठाकूर या मतदार संघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहिले आहेत आणि यापुढेही राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पनवेलच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न येत्या वर्षात कायम स्वरूपी सुटणार आहे आणि त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेले कष्ट कामी येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
         पनवेल विधानसभा मतदार संघाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांवर भर दिला. त्यामुळे या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची विकासकामे झाली. पनवेल विधानसभा मतदार संघ हा राज्यातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मतदार संघ आहे. त्यामुळे प्रचाराच्यावेळी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे तसे कठीणच आहे, मात्र आमदार प्रशांत ठाकूर विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचले असल्याचेही त्यांनी सांगतानाच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत त्यांनाही या विजयाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
Comments