प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खांन्देश सामाजिक विकास संस्थेने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
खांन्देश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठिंबा पत्र सुपूर्द केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तेली समाजाची राज्यस्तरीय संस्था असून मागील ४० वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे. देशस्तरीय तसेच राज्यस्तरीय झालेल्या ठरावानुसार महासभेने भाजप महायुतीच्या उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने पाठिंबा दिला असून पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे, कार्याध्यक्ष तुकाराम किरवे, सचिव प्रवीण धोत्रे, महिला अध्यक्षा रत्नप्रभा पिंगळे, कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे यांनी पाठिंबा पत्र दिले आहे. खांन्देश सामाजिक विकास संस्थेनेही आपला समर्थन देत मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद आमदार प्रशांत ठाकूर खंबीर पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत थोरात, सचिव दिलीप अहिरे, खजिनदार एस. एन. वाघ, सदस्य गणपत थोरात यांनी पाठिंबा पत्र दिले.