राज्यस्तरीय ११ व्या 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचे आयोजन..
विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' 

पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. 
            नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी "रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा" हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली आहे. 
           या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्रावर १३ डिसेंबर, जळगाव केंद्रावर १४ व १५ डिसेंबर, पुणे केंद्र १९ ते २२ डिसेंबर, रायगड (पनवेल) २५ डिसेंबर, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर (पनवेल) केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार आहे.  तर अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.  या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे.  या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक ७५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,  तॄतीय क्रमांक ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक प्रकारचे पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा नाट्य संस्था कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
Comments