महिला रिक्षा संघटनेच्या महिलांसाठी आरोग्य शिबीर संपन्न
पनवेल वैभव/प्रतिनिधी
अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत हे महिला सदस्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. रिक्षा चालक महिला आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते हे लक्षात घेवून नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या सहकार्याने रिक्षा चालक महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन नवीन पनवेल येथे करण्यात आले होते. यामध्ये डोळे तपासणी बरोबरच ब्लड प्रेशर, मधुमेह तपासणी अशा चाचण्या करण्यात आल्या. या शिबीराचा लाभ 30 महिला रिक्षा चालकांनी घेतला. सदर शिबीर नवदृष्टी आय केअर सेंटर येथे घेण्यात आले.
या शिबीरासाठी या हॉस्पीटलचे मुख्य डॉ. संतोष कुमार नायर, डॉ. विजयश्री पाटील, डॉ. निकीता भोसले, डॉ. अश्वथी पोनोली यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिलांना डोळयांच्या समस्या भेडसावत असतील तर आर्थिक दुर्बल महिलांसाठी मोफत ऑपरेशनही करण्यात येईल असे यावेळी डॉ. संतोष नायर यांनी सांगितले. या शिबीराला अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्या व पदाधिकारी उपस्थित होते.