दुबार व बोगस नोंदणी विरोधात बाळाराम पाटील यांची उच्च न्यायालयात धाव
२५ हजारांहून अधिक बोगस मतदारांचा समावेश

पनवेल वैभव वृत्तसेवा :-
विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना १८८ पनवेल विधानसभा क्षेत्रात सहजपणे निवडून येण्यासाठी तब्बल ८५ हजार २११ मते ही दुबार मते नोंदविण्यात आली असून यामध्ये तब्बल २५ हजारांहून अधिक बोगस मतदारांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच याबाबत आपण उच्च न्यायालयामध्ये तशी याचिका देखील दाखल केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत देत भाजपच्या काळया धोरणांचा पर्दाफाश केला.
१८८ पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदार संख्या अंदाजे ५ लाख २२ हजारांहून अधिक आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पनवेलमध्ये भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर मतदार नाराज असल्याचे समोर आले. त्यामुळे भाजपने सत्तेचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये २५ हजार बोगस मतदारांचा समावेश केला असावा अशी शंका माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सदर प्रकार हा निवडणूक आयोग एका दिवसात सुधारू शकतो, मात्र जर निवडणूक आयोगाची इच्छा असेल तर, त्यातच आम्ही याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून तत्कालीन प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यावर देखील कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयाचा आदेश आला तर निवडणूक आयोगाला तसा बदल हा करावाच लागेल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होण्याची चिन्हे आहेत.  आजी-माजी, भावी आमदारांनी चांगलीच कंबर कसली असून नेत्यांची निवडणूकीचे बिगूल वाजण्यासाठी प्रतीक्षा तर काहींनी तर लगीनघाई सुरू केली आहे. हे करतानाच १८८ पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदार याद्यांमध्ये आपापल्या पद्धतीने बाहेर गावाच्या रहिवाशांचे, आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र मंडळी यांचे नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केले असून आपल्याला मतदान जास्त मिळावे व आपणच निवडून यावे यासाठी भाजपने आपापल्या प्रभागात मतदार यादीमध्ये  बोगस नावे समाविष्ट केली आहेत. या सर्व प्रक्रीयेला निवडणूक आयोगाने, प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी चौकशी करून त्या बोगस मतदारांचे नावे वगळावित व बोगस मतदानाला आळा घालावा असे मत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या बोगस मतदारामुळे पुढाऱ्यांना खऱ्या मतदारांच्या मताची कदर राहत नाही आणि निवडुन आल्यानंतर देखील त्यांचा विधानसभा क्षेत्राच्या विकासावर लक्ष केद्रींत राहत नाही. त्यामुळे अशा मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांच्या नावाने  मुंबई उच्च न्यायालयात हरकत घेतली गेली असून बोगस मतदारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात यावी तसेच त्यांची चौकशी करण्याची मागणी देखील माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बोगस मतदार मतदान करताना सापडल्यास त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी बाळाराम पाटील यांनी यावेळी केली.
Comments