दिड दिवसीय घरगुती गणपती बाप्पांचे पनवेल पालिकेच्या रोटरी गणेश विसर्जन तलावात विसर्जन
पनवेल वैभव / प्रतिनिधी :-
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल,पनवेल महानगर पालिका, पनवेल शहर पोलीस, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी केलेल्या आवाहनास पनवेलकर गणेशभक्तांचा उत्साहवर्धक प्रतिसाद,सुमारे एक हजार दिड दिवसीय घरगुती गणपती बाप्पांचे पनवेल महानगर पालिकेच्या रोटरी गणेश विसर्जन तलावात उत्साहपुर्ण वातावरणात, शांततेत विसर्जन केले दुपारी 2 वा सुरु झालेले विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरु होते. विसर्जन सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सदस्य, पनवेल महानगर पालिकेचे कर्मचारी, पनवेल शहर पोलीस यंत्रणा, पनवेल शहर वाहतूक पोलीस यंत्रणे सोबत अनेक सामाजिक संस्था ही सहभागी झाल्या होत्या. दोन तराफे व होडी सह गणेश विसर्जन पथकाचे बारा कार्यकर्ते गणपतींचे विसर्जन करीत होते. काही पर्यावरण प्रेमींनी नवीन पनवेल, खांदा कॉलनी तसेच शहरातील विविध भागातून आपले गणपती बाप्पा आणुन सदर रोटरी गणेश विसर्जन तलावात विसर्जित केले.
या प्रसंगी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त वैभव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे , वाहतूक पोलीस निरीक्षक संजय पाटील साहेब यांनी भेट देऊन आपापल्या विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून योग्य नियोजन केले होते.
प्रथमच या विसर्जन सोहळ्याचे you tube द्वारे सर्व गणेश भक्तांना Live दर्शन करण्याची योजना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत करण्यात आली जेणेकरून जेष्ठ गणेश भक्तांना आपल्या गणेशाचे विसर्जन आपल्या घरी बसून पाहता आले. तलाव व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर निर्माल्य गोळा करून त्याचे योग्यनियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड व स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे यांनी चोख बजावली. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे संस्थापकीय सदस्य माजी रोटरी प्रांतपाल, पनवेल मधील जेष्ठ शल्य चिकिस्तक डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव व सदर प्रकल्पाचे प्रमुख दीपक गडगे, खजिनदार ऋषिकेश बुवा यांचेसह क्लब चे सर्व सदस्य,एन्स तसेच इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्याने हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
या विसर्जन व्यवस्थेचे सर्व पनवेलकर नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.