रुग्णवाहिकेसाठी लवकरच टोल फ्री नंबर..
पनवेल वैभव,दि.15: नुकत्याच घडलेल्या गरोदर मातेस संदर्भ सेवेवेळी १०८ रुग्णवाहिका न मिळाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये व जनसामान्यास महापालिका देत असलेल्या सोयीसुविधांची माहीती मिळणेसाठी आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील गरोदर मातेस उपलब्ध मोफत रुग्णवाहिका सेवेचे टोल फ्री नंबर लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहेत.
आजपर्यंत महापालिकेच्यावतीने गरोदर मातेसाठी निशुल्क उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेने 289 प्रसुती रुग्णांसाठी अगदी मुंबई पर्यंत संदर्भ सेवा दिली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेतील प्रसुती रूग्ण परदेसी गौंड यांना न मिळालेल्या संदर्भ सेवेबाबत चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार प्रसुती पूर्व आशा सेविका व आरोग्य सेविकांमार्फत वारंवार भेट देऊन माता बाल संगोपन कार्ड वरती रुग्णवाहिकेचे १०८ व १०२ नंबर तसेच आशा सेविकेचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. गरोदर मातेच्या सर्व चाचण्या, सोनोग्राफी महापालिकेमार्फत निशुल्क करून देण्यात आल्या होत्या.
परंतु सदर गरोदर मातेस दिलेल्या तारखे आधीच प्रसुती वेदना सुरू झाल्या व त्यांना खाजगी डाॅक्टरांनी १०८ क्रमांवर संपर्क साधून उपजिल्हा रुग्णालय येथे जाण्याचे सुचवले.त्यानूसार नातेवाईकांनी १०८ टोल फ्री क्रमांकावरील रुग्णवाहिकेस कळविले ,मात्र पुन्हा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा व रुग्ण नातेवाईक यांचेमध्ये फोनद्वारे योग्य तो संपर्क झाला नाही. तसेच नातेवाईकाने १०२, उपजिल्हा रुग्णालय , महानगरपालिकेच्या रुग्णावाहिकेसाठी कोणताही संपर्क साधला नाही. तोपर्यंत उशीर होत असल्याने नातेवाईकांनी उपलब्ध वाहनातून रुग्णास उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे प्रसुतीसाठी दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची नैसर्गिक प्रसुती होऊन बाळास जन्म दिला.दिनांक १२ सप्टेंबर रोजी रुग्णालयातुन डिस्चार्ज देवुन घरी मातेस घरी सोडण्यात आले.
रुग्णवाहिकेच्या १०८ क्रमांक आस्थापनेस याबाबतचा संपूर्ण खुलासा सादर करण्याबाबत चौकशी समितीने सुचित केले आहे. भविष्यात अशा संदर्भ सेवे पासून रुग्णांनी वंचित राहू नये यासाठी पालिकेच्या रूग्णवाहिकेसाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. टोल फ्री नंबर आल्यानंतर यास व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
रुग्ण सेवेसाठी पनवेल महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध असून इतर रुग्णांसाठीच्या संदर्भ सेवेसाठी देखील लवकरात लवकर ठराव घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आयुक्तांनी संबधित विभागास सूचित केले आहे.
चौकट
पनवेल महानगरपालिकेची गरोदर मातांसाठी निशुल्क रुग्णवाहिका सेवा
१.डाॅ.रेहाना मुजावर, माता बाल संगोपन अधिकारी, मोबाईल क्रमांक ९३७२८८७१२३०
२.वाहन चालकचे नाव : नरेंद्र सोनवणे मोबाईल क्रमांक ७०२१५७२९१६ ,वेळ सकाळी ७.०० ते रात्री ७.००
३.वाहन चालकचे नाव : धर्मा गवळी मोबाईल क्रमांक ९५९४७४६५२७, वेळ रात्री ७.०० ते सकाळी ७.००