विसर्जनाच्या माध्यमातून पनवेल शहर पोलिसांनी साधला जनतेशी संवाद..
पोलीस व्हॉटस्अप ग्रुप मध्ये सामील होण्याचे केले आवाहन
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः गणेश विसर्जनाच्या माध्यमातून गणेश भक्तांशी संवाद साधण्याचे व त्याद्वारे जास्तीत जास्त नागरिकांनी व्हॉटस्अप ग्रुपमध्ये सामील होण्याचे आवाहन व मार्गदर्शन पनवेल शहर पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील दिड दिवसाचे गणेश विसर्जन, पाच दिवसाचे गणेश विसर्जन तसेच 7 दिवसाचे गणेश विसर्जन यावेळी पनवेल शहरात व परिसरात असलेल्या विविध विसर्जन स्थळी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त सहकुटुंब बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात. येणार्‍या भाविकांमध्ये जनजागृती करावी, या उद्देशाने वपोनि नितीन ठाकरे यांनी शहरातील सर्वच विसर्जन ठिकाणी जनजागृती बॅनर लावले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक मंडळांच्या परिसरात अशा प्रकारे पोलीस व्हॉटसअप ग्रुपमध्ये सामील होण्याचे आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. एवढे करून न थांबता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी प्रत्यक्ष विसर्जनस्थळी जावून तेथील गणेश भक्तांना नव्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या पोलीस व्हॉटस्अप ग्रुप अ‍ॅपची माहिती देण्यात आली. तसेच ते अ‍ॅप कसे डाऊनलोड करावे ते दाखवून ते उपस्थितांकडून करून घेतले. या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड तसेच इतर फसवणुकीचे गुन्हे याबाबत सतर्क राहण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने पोलीस काम करीत असून त्या दृष्टीकोनातून पनवेल शहर पोलिसांनी सुद्धा जास्तीत जास्त जनजागृती करून नागरिकांना सदर अ‍ॅप डाऊनलोड करण्यात भाग पाडले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Comments