१ ऑगस्ट रोजी जासई येथे कार्यकर्ता मेळावा
पनवेल /प्रतिनिधी - : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७७ वा वर्धापन सोहळा 2 ऑगस्ट रोजी मोठया उत्साहात होणार असून यानिमित्त पंढरपूर येथे शेकापचे दोन दिवस भव्य अधिवेशन भरविले जाणार आहे. तर १ ऑगस्ट रोजी उरण-जासई येथे वर्धापन दिना निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस गणेश कडू व पनवेल- उरण पक्ष संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई पॅलेस येथे भाई डॉ. गणपतराव देशमुख नगरीत हा सोहळा गुरुवारी 2 व शुक्रवारी 3 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष संपतबापू पवार पाटील व स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख असणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन पंढरपूर येथे होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते या अधिवेशनात सामील होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे.
रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. एक वेगळा उत्साह व उमेद घेऊन कार्यकर्ते अधिवेशनाला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. अधिवेशनात सहभाग होण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या अधिवेशना मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आली आहे. पंढरपूर येथील अधिवेशनामध्ये आणि जासई येथील कार्यकर्ता मेळाव्यात पक्षश्रेष्ठींकडून मोलाचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळणार आहे. जास्तीत जास्त
कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेकापच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.