बस आगार स्थलांतरित करण्याची प्रवासी संघाची मागणी चुकीची, मनसे याचा विरोध करणार - संदीप पाटील..
    मनसे याचा विरोध करणार - संदीप पाटील

पनवेल /  वार्ताहर  - : पनवेल बस आगार काळानुरूप शहराबाहेर नेण्याची मागणी पनवेल प्रवासी संघाने केली असून त्याला मनसेने विरोध केला आहे. ही मागणी म्हणजे नोकरदार आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे मनसेचे पनवेल प्रभाग अध्यक्ष संदीप पाटील यांनी म्हटले आहे.
       पनवेल प्रवासी संघ गेली अनेक वर्ष प्रवाशांच्या सोयीसाठी झटत आहे. त्यांनी विविध समस्या सोडवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे. पण पनवेल बस आगार काळानुरूप शहराबाहेर असावे अशी मागणी अत्यंत चुकीची वाटत आहे. आताचे आगार हे गेली अनेक वर्ष याठिकाणी असल्याने पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरात येणा-या नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातील नोकरदार वर्ग देखील आतापर्यंत योग्य ठिकाण म्हणूनच बसने प्रवास करत आला आहे. भविष्यात येणारी अडचण म्हणून जर स्थलांतरितच विषय येणार असेल तर त्याला आणखी पर्याय निघू शकतात. एवढी मोठी मागणी करण्यापूर्वी प्रवासी संघाने पनवेलकरांचे मत जाणून घ्यायला हवे होते. या मागणीच्या विरोधात पनवेलकर संताप व्यक्त करीत असून मनसेच्या वतीने देखील या मागणीचा विरोध करत असल्याचे सांगत मनसे हे कदापि होऊ देणार नसल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. तर प्रवासी संघाच्या इतर मागण्यांसाठी आम्ही सोबत असल्याचे देखील ते म्हणाले.

Comments