रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस - पद्मश्री मधु मंगेश कर्णिक..
केशवसुत स्मारकाला रामशेठ ठाकूर यांच्याकडून १० लाखाची मदत
पनवेल -  राजकारणापेक्षा रामशेठ ठाकूर याचं समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक काम मोठे आहे.समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे,त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस असल्याचे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे काढले.

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने एक कृतार्थ संध्याकाळ .. या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन,सन्मान पुरस्कार व सत्कार सोहळ्याप्रसंगी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोलत होते

पनवेलच्या विरूपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी-साहित्यिक अशोक नायगावकर,अरुण म्हात्रे,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख प्रा.एल.बी. पाटील,जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख,सचिव डॉ. एस.टी गडदे,माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला,पनवेल तालुका भाजपाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत,माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत,उत्तर रायगड भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी,कोमसाप मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ,सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.पाटील,जे.डी.तांडेल, खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी आदी उपस्थित होते.

यापुढे बोलताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणाले, साहित्याला संस्कार आहेत. आजच्या समारंभाला सरस्वती,साहित्याचा स्पर्श आहे.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे काम लोकनेते रामशेठ ठाकूर या भागात करत आहेत.महाराष्ट्रात कुठेही साहित्यिकांची स्मारके नाहीत. मालगुंड येथे केशवसुतांचा जन्म झाला.आमचं भाग्य आहे की, रत्नागिरीच्या मालगुंड येथे आधुनिक ज्ञानेश्वर अर्थातच केशवसुत यांच स्मारक आम्ही उभं करू शकलो.जिथे-जिथे मराठी भाषा बोलली जाते,मराठी लेखन केले जाते,तिथे केशवसुतांचे साहित्य वाचलं जातं.राजकारण एक माध्यम आहे,त्यात विधायक-रचनात्मक पद्धतीने लोकनेते रामशेठ ठाकूर काम करत आहेत.पनवेल हे कोकणचे नाक आहे,कोकणची श्रीमंती आहे.या जिल्ह्यात मोठी गुंतवणूक होत आहे,अशा जिल्ह्याचे रामशेठ ठाकूर कर्तबगार नेतृत्व असल्याचे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.

केशवसुत स्मारकाला रामशेठ ठाकूर यांची १० लाखाची मदत..

यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले,ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे याचे मला खूप समाधान वाटत आहे.आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक लहान मोठे कार्यक्रम झाले.दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मोठ-मोठे कार्यक्रम झाले परंतु त्या कार्यक्रमातून जो मला आनंद मिळाला नाही तो आनंद मला आजच्या कार्यक्रमातून मिळाला.आजच्या साहित्यिक कार्यक्रमासारखे वर्षातून अनेक उपक्रम आहेत असे सांगून जन्मगाव असलेल्या रत्नागिरीच्या मालगुंड येथे  केशवसुतांचे स्मारक आहे,त्या स्मारकाला १० लाखाची मदत रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केली त्याचप्रमाणे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे कोकण आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये भरवण्यासाठी संमती दिली.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले,राजकारणात राहून राजकारणात नसलेला आणि समाजकारणात खंबीरपणे उभा असलेला हा नेता म्हणजे रामशेठ ठाकूर.मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख म्हणायचे,
प्रत्येक जिल्ह्यात एक रामशेठ ठाकूर यांच्यासारखे नेतृत्व असायला पाहिजे.पालघरच्या आदिवासी भागातील मोखाडा येथे रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय उभं केलं ते रामशेठ ठाकूर यांच्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा झालेला सत्कार,हा त्यांचा सत्कार नसून उद्याच्या पिढीला रामशेठ ठाकूर यांचे कार्य कळावे म्हणून झालेला हा सत्कार समारंभ आहे.
रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिल्यानंतर देता-देता इतके द्यावे,देणाऱ्यांनी रामशेठ व्हावे असे सांगितले.

सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विविध क्षेत्रात अफाट काम आहे.महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या बाजूला व्यासपीठावर बसण्याचा योग आला हे माझे भाग्य आहे.
 लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यिक देखण्या कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यांनी आई वरती माय कविता सादर केली.आपल्या भाषणातील काव्यातून सभागृहाला पोट धरून अशोक नायगावकर यांनी हसायला लावले.
सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या परिचयातील माजी खासदार हा शब्द मला खटकतो,त्यांनी अखंड खासदार रहावे असे व्यक्तिमत्व म्हणजे रामशेठ ठाकूर आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूर हे आपल्या गावाहून प्रतिभा घेऊन आले,मी त्यांना शिक्षकाच्या भूमिकेतून पाहतो.आजच्या सुंदर साहित्यिक सोहळ्याचे त्यांनी कौतुक करून आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.यानंतर झालेल्या सन्मान पुरस्कारात 
 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल,रायगड जिल्हा परिषदेने उत्कृष्ट शाळा म्हणून गौरवलेली पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेची वारदोली शाळा,
गरीब गरजूंच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारे खारघर येथील प्रा.डॉ.गोरोबा डोंगरगावकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पनवेल,नवीन पनवेल,उरण,कर्जत शाखांमधील ज्येष्ठ साहित्यिक ए. के.शेख,अँड.प्रा चंद्रकांत मढवी,ऍड.गोपाळ शेळके,किशोर डी.पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले,त्यांनी आपल्या प्रास्तिकात नवीन पनवेल शाखेच्या वर्षभरातील कार्यक्रम- उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी आणि दर्शना माळी यांनी केले तर प्रार्थना मनस्वी माळी हिने गायली.यावेळी आलेल्या कवी,लेखक,साहित्यिक त्याचप्रमाणे शैक्षणिक,सांस्कृतिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Comments