कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश किर यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश किर यांचा उमेदवारी अर्ज दाखल...


बेलापूर/ प्रतिनिधी.
     महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदार संघ, नाशिक शिक्षक मतदार संघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील चार जागांकरिता जून महिन्याच्या २६ तारखेला निवडणुका होत आहेत. सोमवार दिनांक ३ जून रोजी काँग्रेस पक्षाचे रमेश कीर यांनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्ष या चार जागांपैकी दोन ठिकाणी लढणार असल्याची माहिती नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.
          सोमवारी रमेश कीर यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा दळवी,राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील उपस्थित होते.
        या निवडणुकीसाठी  ३१ मे  रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. ७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी १० जून रोजी केली जाईल. 
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत  १२ जून आहे. २६  जून  रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ५ जुलै  रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
       ३१ मे पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जांची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे.७ जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

२८ मे २०२४ रोजीची एकूण मतदारसंख्या
मुंबई शिक्षक मतदारसंघात            १५,९१९ 
नाशिक शिक्षक मतदारसंघात        ६६,५५७ 
मुंबई पदवीधर मतदारसंघात        १,१६,९२३ 
कोकण पदवीधर मतदारसंघात     २,१३,९१७


चौकट:
बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कोकण पदवीधर मतदार संघामध्ये निवडणूक लढली जाणार आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक वेळेला आघाडी धर्म पाळत असताना काँग्रेसचे चिन्ह नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी फारसे खुश नसायचे. परंतु आता मात्र काँग्रेस पक्षाच्या पारंपारिक निशाणीवरती ही निवडणूक होणार असल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. - सुदाम पाटील.
Comments