महाविकास आघाडीमध्ये "ऑल इज वेल" ; पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी रमेश कीर सज्ज...
पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी रमेश कीर सज्ज 
 पनवेल / वार्ताहर : -          
महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील चार विविध जागांसाठी या महिन्याच्या २६ तारखेला मतदान होणार आहे. यापैकी एक कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कीर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोर जैन यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काही कालावधीसाठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्यामुळे रमेश कीर यांच्या रूपाने एक सक्षम उमेदवार महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. "ऑल वेल दॅट्स एंड वेल" असे म्हटले जाते त्या मुळे महाविकास आघाडीमध्ये "ऑल इज वेल" असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
          कोकण पदवीधर मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाकडून रमेश कीर यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेच्या किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्यात देखील एक अस्वस्थता पाहायला मिळत होती. संजय राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यातील स्टेटमेंट वॉरमुळे ही अस्वस्थता आणखीनच वाढीला लागली होती. अखेरीस दिल्ली मधून पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमेश कीर यांनी नुकतीच नागोठणे येथे जाऊन किशोर जैन यांची भेट घेतली.यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे मा आमदार बाळाराम पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य  आर सी घरत, पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, युवा नेते अशफाक भाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 
         अत्यंत सकारात्मकरित्या झालेल्या चर्चेअंती महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकोप्याने लढण्याचा निर्धार केला. याच मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी चे निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघाचे ते विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत होते. पदवीधरांच्या प्रश्नांची परिपूर्ण जाण असणारे रमेश कीर यांच्या रूपाने त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्यात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश पाहता मित्र पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह दुणावलेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर निरंजन डावखरे यांना यंदाची निवडणूक चांगलीच जड जाईल असा राजकीय विश्लेषकांचा कयास आहे.
Comments