शेअरट्रेडींग अधिकचा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने साडे बावीस लाखाची केली फसवणूक..
पनवेल दि.२६(वार्ताहर): शेअरट्रेडींगमध्ये आमची कंपनी अधिकचा नफा मिळवून देईल असे आमिष दाखवून खांदेश्वर वसाहतीमध्ये राहणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीला साडेबावीस लाखांना फसविण्यात आले आहे. या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलीस भामट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात भामट्याने साडेअठरा लाख रुपये ऑनलाईन बॅंक खात्यावर वळते करुन आणि चार लाख रोख रक्कम स्विकारुन ही फसवणूक केली आहे.
नवी मुंबई पोलीस दलाकडून ऑनलाईन शेअर ट्रेडींगचे व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी जागरुकपणे ज्या गुंतवणूकदार कंपनीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करतोय त्याची खात्री कऱण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सूशिक्षित वर्गाकडून नवीन गुंतवणूक करताना कंपन्यांची माहिती घेतल्याशिवाय व्यवहार केल्याने मोठ्या प्रमाणात सूशिक्षितांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. खांदेश्वर वसाहतीमधील ४४ वर्षीय इसमाला ऑनलाईन ट्रेडींग कंपनीच्या नावाने फोनवर संपर्क साधला गेला. त्यांची फसवणूक करण्यासाठी भामट्यांनी दोन वेगवेगळे मोबाईलनंबर वापरले. मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवरुन अयान अन्सारी व अहमद या दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांचा विश्वास संपादनासाठी इंडीयन डीमॅट खाते असल्याचे सांगण्यात आले. सध्या मिळत असलेल्या नफ्यापेक्षा अधिक नफा अल्ट्रा ग्लोबल मार्केट या कंपनीत पैसे गुंतविल्यास नफा मिळेल असे सांगून त्यांची साडेअठरा लाख रुपये भरायला सांगीतले. व त्यानंतर पुन्हा वेगवगेळ्या कारणांद्वारे पैसे मागून साडे बावीस लाखांची फसवणूक केली.