शेकाप नेते प्रमोद भगत यांचे परखड मत..
पनवेल / वार्ताहर :-
सामान्य माणसांचे प्रश्न दिल्लीमध्ये जाऊन मांडण्याची कुवत असणारे संजोग वाघेरे पाटील हेच कामोठेवासीयांची पहिली पसंती ठरतील असे परखड मत शेकाप नेते प्रमोद भगत यांनी मांडले.
विद्यमान खासदारांना एक-दोन कार्यक्रमातील उपस्थिती व्यतिरिक्त कामोठेवासीयांनी पाहिलेले नाही. तसेच त्यांनी कामोठेवासीयांचा कुठलाही प्रश्न धसास लावलेला नसल्यामुळे येथील जनतेचा त्यांच्यावर रोष असल्याचे रोखठोक मत प्रमोद भगत यांनी मांडले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रमोद भगत यांनी पनवेल पंचायत समितीचे सभापतीपदी विशेष लक्षणीय कामगिरी करून दाखविली आहे. त्यानंतर हा भूभाग महानगरपालिकेत अंतर्भूत झाल्यानंतर त्यांनी येथून नगरसेवक पद देखील भूषविले आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा नियोजन मंडळावर त्यांनी त्यांच्या संघटनात्मक कार्याची छाप उमटवली आहे. तूर्तास माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा समितीवर ते कार्यरत असून कामोठेवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेत असतात.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रमोद भगत म्हणाले की यापूर्वी दोन वेळा लोकसभेच्या उमेदवारासाठी मावळात अर्ज दाखल करण्यासाठी मी गेलेलो आहे. परंतु २३ एप्रिल रोजी संजोग वाघेरे पाटील यांच्या समर्थनार्थ जो जनसैलाब मी आकुर्डी येथे पाहिला तो न भूतो न भविष्यती होता. यावरून मी निश्चितच सांगू शकतो की अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत परिवर्तन होणार आहे आणि विद्यमान खासदारांना घरी बसावे लागणार आहे.
ते म्हणाले की मी कार्यरत असणाऱ्या कामोठे वसाहतीमध्ये विद्यमान खासदार हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या वेळा फक्त कार्यक्रमांना उपस्थिती दाखविण्यापुरते आले. कुठल्याही विकास कामांमध्ये त्यांचे योगदान नाही. त्यांनी पाठपुरावा केलेल्या अथवा निधी मिळवून दिलेल्या माध्यमातून केलेले एक तरी काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला दाखवावे. विद्यमान खासदारांच्या निष्क्रिय कार्यशैलीचा दाखला देताना प्रमोद भगत म्हणाले की माझ्या काही कार्यकर्त्यांनी कळंबोली मॅकडोनाल्ड समोर मुंबई दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी केली होती. लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करून येणारे प्रवासी बांधव या ठिकाणी उतरत असतात. बराच वेळ प्रवास करून आल्यानंतर त्यांना नैसर्गिक विधीला जाण्याची अत्यंत गरज असते. याच प्रामाणिक भावनेतून माझ्या कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदारांकडे पाठपुरावा केला होता. दुर्दैवाने नमूद करावे वाटते की खासदारांनी अर्ज स्वीकारण्या पलीकडे काहीही केले नाही. या ठिकाणी शौचालय उभारणी करता लागणारी जमीन कशी मिळवावी याकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, महानगरपालिका अशा अनेक आस्थापनांशी समन्वय साधावा लागणार होता. अर्थातच खासदार महोदयांकडून ती अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांनी ठेवली होती. परंतु आमच्या पदरात निराशाच पडली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय नागरिकांच्या कडे उपलब्ध झालेला आहे. महानगरपालिकेच्या मोठ्या क्षेत्रामध्ये समस्या निराकरणाचे त्यांनी काम करून दाखविले आहे. त्यामुळे कामोठेवासीयांचे प्रश्न दिल्ली दरबारात मांडून त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांनाच कामोठेवासीय पाठिंबा देतील असा मला ठाम विश्वास वाटतो.