बँक ग्राहकांचे पैसे लुटणाऱ्या टोळीतील एकाला गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने केले जेरबंद...
 गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने केले जेरबंद


पनवेल दि. २६ ( वार्ताहर ) : बँकेमधून रोख रक्कम काढणाऱ्या लोकांवर पाळत ठेवून, त्यांचा मोटारसायकल वरुन पाठलाग करत लुटमारी करणाऱ्या तसेच कारची काच तोडून कार मधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीतील सराईत चोरट्याला गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने अटक केली आहे. 
प्रवीण राजू गोगुला (२३) असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याने त्याच्या इतर साथीदारासह वेगवेगळ्या भागात केलेले ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्याच्याकडून या गुन्ह्यातील एकूण २.८३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.                        
तळोजा भागामध्ये एका व्यक्तीची २ लाख रुपयांची रोख रक्कम अशाच पध्दतीने चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष- ३ च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान सदर गुन्ह्यात आंध्र प्रदेश येथील नेल्लोर जिल्ह्यातील सराईत आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे तसेच सदर टोळी बँकेसमोर रेकी करतानाच रक्कम काढून बाहेर आलेल्या ग्राहकांना लुटत असल्याची माहिती तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच बातमीदाराकडून गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने प्रवीण राजू गोगुला (२३) याची माहिती काढून त्याला पुण्यातील दौंड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह नवी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी ८ गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या कडून  वापरण्यात आलेल्या २ युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण २.८३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर टोळीने तळोजा, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, मानपाडा आदि भागात ८ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्हयांव्यतिरिक्त अटक आरोपीने ठाणे, शिर्डी, फलटण येथे गुन्हे केल्याची कबुली दिसून असून त्याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष- ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफमुलाणी आणि त्यांच्या पथकाने केली. या टोळीवर आंध्र प्रदेशमध्ये मचेला टाऊन, विनुकोडा, मरकापूर टाऊन पोलीस ठाणे तसेच शिरुर, भोसरी, सहकारनगर, शिक्रापूर, कोथरुड, विमानतळ पोलीस ठाणे येथे चोरी, जबरी चोरीचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत.


फोटो - गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने केले जेरबंद
Comments