फेसबुक व इंस्टाग्रामवर सुसाईड करणार असे स्टेट्स ठेवणाऱ्याचा बचावला जीव...
पनवेल शहर पोलिसांची कामगिरी ...


पनवेल दि १९. (संजय कदम): कौटुंबिक अडचणीमुळे नैराश्य झालेल्या एका इसमाने   फेसबुक व इंस्टाग्राम वर लाईव्ह सुसाईड करणार असे स्टेट्स ठेवले होते हि बाब त्याच्या मित्राच्या लक्षात येताच त्याने याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली व पोलिसांनी तात्काळ लोकेशन द्वारे सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन करून त्याचे मनपरिवर्तन केल्याने अखेरीस त्याने जीव न देण्याचा निर्णय घेतला व सुखरूप त्याला घरी सोडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.
           पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत हे रात्री कर्तव्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना मुंबई येथून एका इसमाचा फोन आला व सदर इसमाच्या मित्राने  त्याच्या मोबाईलवर स्टेटस ठेवला असून त्यात तो रात्री ११ वाजता फेसबुक व इंस्टाग्राम वर लाईव्ह सुसाईड करणार असे  नमूद केले आहे तरी त्याचा जीव  वाचवा अशी त्याने विनंती केली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली व तसेच पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील इतर अधिकारी व अंमलदारांना या बाबतच्या सूचना दिल्या व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर इसमाचा शोध सुरु केला असता तो करंजाडे येथे आढळून आला,  त्याला ताब्यात घेऊन त्याच्या अडचणी जाऊन घेण्यात आल्या.  यावेळी त्याने कौटुंबिक नैराश्य पोटी सदर स्टेटस ठेवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत व इतर अधिकाऱ्यांनी सदर इसमाचे समुपदेशन करून त्याचे मनपरिवर्तन केल्याने अखेरीस त्याने जीव न देण्याचा निर्णय घेतला  व त्याला मुंबई येथील त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी  कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.    
फोटो: पनवेल शहर पोलिसांनी बचावला जीव
Comments