पनवेल एसटी आगाराच्या कामाला मंजुरी फेब्रुवारी महिन्यात होणार सुरुवात ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश...
आ.प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश...


पनवेल ( प्रतिनिधी) पनवेल येथील एसटी आगाराच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे 235 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मे. इडस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 16) आगाराला भेट देऊन पाहणी केली.
मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमधील बस आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून एसटी गाड्या ये-जा करीत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या बसस्थानकातून प्रवास करतात. त्यासाठी पनवेल आगारातून 56 गाड्यांच्या मदतीने रोज 48 नियते चालवली जातात. यामध्ये सातारा, एरंडोल, धुळे, अहमदनगर व शिर्डी या सहा लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या नऊ महाड विनावाहक आणि सुमारे 70 फेर्‍या गाव पातळीवरील आहेत. त्यासाठी 56 चालक, 56 चालक-वाहक व 92 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोज पाच हजारपेक्षा जास्त गाड्या या स्थानकात येत असतात.
डिसेंबर महिन्यात पनवेल आगाराचे भारमान 110 टक्के होते. विभागात उत्पन्नमध्ये हे आगार क्रमांक एकवर आहे. महिला सन्मान योजना जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिला एसटीने प्रवास करीत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी किंवा नातेवाईकही प्रवास करीत असल्याने एसटीचे उत्पन्न वाढले. पनवेल आगार प्रमुख सुचित डोळस यांनी या भागातील शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना असलेल्या सवलतीचा लाभ घेण्यास सांगितले. त्यामुळे यापूर्वी फक्त 900 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत होते. आज त्यांची संख्या दोन हजारहून अधिक झाली आहे. अडीच लाख लाभार्थी विविध योजनांचा लाभ घेत असल्याने या आगाराचे उत्पन्न सप्टेंबर महिन्यापासून वाढत आहे. त्यामुळे या आगाराचे काम लवकर सुरू व्हावे अशी सगळ्यांची मागणी होती.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनन्सही पनवेल येथे होणार आहे. येथील नागरीकरण वाढीचा वेग पाहून एसटी आगाराच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तेव्हा कामाला मंजुरी मिळाली नाही. आता महायुतीच्या काळात मे. इडस कंपनीच्या 235 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
सध्या ज्या जागेत डेपो आहे त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये मॉल, पीव्हीआर आणि इतर व्यावसायिक असतील. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध माध्यमातून याचा सतत पाठपुरावा केल्याने आता 15 फेब्रुवारीच्या आसपास कामाला सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.
Comments