क्राईम ब्रांच विभागाचा पोलीस असल्याची बतावणी करून १,४९,००० रुपये किमतीचा ऐवज लुटणारा सराईत गुन्हेगार गजाआड..
ऐवज लुटणारा सराईत गुन्हेगार गजाआड.. 

पनवेल दि २५ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील एका पान टपरीवाल्यास आपण  क्राईम ब्रांच पोलीस असल्याची बतावणी करून एक लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा ऐवज लुटणारा सराईत गुन्हेगार पनवेल  तालुका पोलिसांनी   गजाआड  केले आहे. 
              येथील नवकार कंपनीच्या गेट समोर असणाऱ्या एका पान टपरीवाल्यास अज्ञात इसमाने आपण  क्राईम ब्रांच पोलीस असल्याची बतावणी करून  प्रथम त्याच्या पान टपरीमध्ये प्रवेश करून तेथे असलेल्या गल्ल्यातील  ७० हजार, रोख रक्कम जबरीने चोरून त्याच्यावर केस करून अटक करण्याची व मारहाण करण्याची धमकी देऊन त्याला स्कुटी वर बसवून कोन गाव,  पळस्पे फाटा व त्यांनतर टोल नाक्याजवळील ट्रक पार्किंगच्या जागेमध्ये त्याला नेऊन त्याच्या कडे हप्ता मागून त्याच्या मोबाईल मधून जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर  करण्यास सांगून त्याच्या कडील दोन मोबाईल फोन, मनगटी घड्याळ असा ऐवज काढून घेऊन त्याला धमकावून त्याला मारहाण करून एकूण जवळपास एक लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन तो पसार झाला होता. याबाबतची  तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, आकाश भगत आदींच्या पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्तबातमीदाराच्या माहितीच्या आधारे सदर आरोपी नामे मो. अल्ताफ. मो. अकीउल्ला खान (वय ४६) रा. धारावी  याला  वाशी परिसरातून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे अश्याप्रकारचे विविध गुन्हे  उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 



फोटो - आरोपींसह पोलिसांचे पथक
Comments