राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये; ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर
डॉ. मोहन आगाशे यांना 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर ...


पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या 'जीवन गौरव' पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १७ नोव्हेंबर) येथे पत्रकार परिषदेत दिली.   
      श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे १० वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
           आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दिनांक ०८ ते १० डिसेंबर पर्यंत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. तत्पूर्वी नागपूर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा व पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरी पार पडली असून १८ व १९ नोव्हेंबरला रायगड केंद्राची तर २४ ते २७ नोव्हेंबर पर्यंत मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्रांची प्राथिमक फेरी होणार आहे.  अंतिम फेरीचे उदघाटन ०८ डिसेंबर तर पारितोषिक वितरण सोहळा १० डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.  
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी सांगितले कि, या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढत आहे.  सांस्कृतिक कट्टा राज्यभर पसरला असून या क्षेत्रातून कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगतानाच ओमकार भोजने, संदीप रेडकर, अजिंक्य ननावरे हे सुद्धा मेहनत घेऊन अशाच स्पर्धेतून पुढे आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच अंतिम फेरीचे परिक्षण नाट्य सिने क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या नजरेतून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आणि स्पर्धेचे स्वतःचे शिर्षक गीत असलेली हि महाराष्ट्रातील एकमेव एकांकिका स्पर्धा असून यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते अजिंक्य ननावरे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप तर मिडिया प्रायोजक इट्स माजा डॉट कॉम असल्याचेही त्यांनी नमूद केले.  
चौकट -
नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी "रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा" हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली आहे. 

-------------------अशी आहेत पारितोषिके :-------------------------------------------
प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक 
द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
 तॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
 चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह 
उत्तेजनार्थ दोन बक्षिसे - प्रत्येकी ०५ हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह 
विनोदी एकांकिका - ०७ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 
लक्षवेधी एकांकिका- ०७ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 
-----------------------------------------------------------------------------
             - वैयक्तिक पारितोषिके -
 सर्वोत्कॄष्ठ- दिग्दर्शक/  अभिनेता/ अभिनेत्री/ लेखक/ नेपथ्य / प्रकाश योजना/ संगीत 
प्रथम क्रमांक- ०२ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक- ०१ हजार ५०० रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
 तॄतीय क्रमांक- ०१ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ - ५०० रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
उत्कृष्ट वेशभूषा (कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ)- ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  
उत्कृष्ट विनोदी कलाकार - ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  
उत्कृष्ट बालकलाकार - ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह  
-----------------------------------------------
  
प्रत्येक केंद्रावरील सर्वोत्कृष्ट एकांकिका 
प्रथम क्रमांक - ०७ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 
द्वितीय क्रमांक - ०५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 
----------------------------------------------------------------------------------------------------------
Comments