गुन्हे शाखेची कारवाई...
पनवेल दि.१६(वार्ताहर): सध्या वर्ल्ड कपचे फिवर सर्वत्र सुरु असून त्याचा फायदा घेत काही जण प्रत्येक क्रिकेट मॅच वर पैशाचा सट्टा लावण्याचे काम करत आहेत. त्याच्या विरोधात नवी मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून उलवे येथ टाकलेल्या धाडीमध्ये चौघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून २३ मोबाइल व तीन लॅपटॉप जप्त केले आहे.
उलवे सेक्टर २३ येथील विश्वा सियोना इमारतीमध्ये वर्ल्ड कप क्रिकेट मॅच सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच पोलीस उप आयुक्त अमित काळे व सहायक पोलीस गजानन राठोड मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वपोनि माणिक नलावडे, पोउपनि प्रताप देसाई, पोलीस अंमलदार प्रशांत काटकर, किरण राउत, ज्ञानेश्वर सांगळे, राजकुमार दुधाळ, राहुल वाघ, धनाजी भांगरे, लहुकुश शिंगाडे, संदिप कोळी व सायबर तज्ञ पुष्कर झांटे या पथकाने सदर ठिकाणी धडक दिली. यावेळी एका फ्लॅटच्या झडतीमध्ये चौघे जण सट्टा लावताना आढळून आले. करण जाधव (३२), मनीष चावला (२३), अतुल भळगट (४५) व राकेश कोंढरे (४२) यांना ताब्यात घेतले. हे चौघेही पुणेचे राहणारे असून सट्टा लावण्यासाठी त्यांनी तेथे घर घेतले होते. मोबाइलमधील अॅप्लिकेशनद्वारे ते ग्राहकांकडून सट्टा लावून घेत होते. वापरलेले २३ मोबाइल, तीन लॅपटॉप आणि एक टीव्ही व इतर साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिस अधिक तपास करत आहेत.
फोटो: सट्टा आरोपी