२४ सप्टेंबर रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सत्यशोधक सम्मेलनाचे आयोजन...
       सत्यशोधक सम्मेलनाचे आयोजन...

पनवेल / वार्ताहर  : २४ सप्टेंबर २०२३ रोजी भारत मुक्ती मोर्चाचे वतीने सत्यशोधक सम्मेलन आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी १५० वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना करताना त्यांनी जो उद्देश निर्धारित केला होता त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी त्यांनी बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेतले होते. संमेलन कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे आहेत. तर अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, इतिहास संशोधक मा.म.देशमुख, हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा आढाव, आमदार रोहीत पवार, वासंती नलावडे, विठ्ठल सातव, प्रा.जे.के.पवार, डॉ.मगन ससाणे, कुंदा तोडकर, ऍड. राहुल मखरे, ऍड. माया जमदाडे,  शिवाजी पाटील, हिजबुल रहेमान , घनश्याम आलमे, इंजि. निशिकांत जावरे इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला पनवेल, रायगड, नवी मुंबईतून हजारो नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
      बहुजन समाज हा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या गुलाम होता. या गुलामीतून बहुजन
समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून एक वैचारिक आंदोलन उभे
केले होते. त्यांच्या निर्वाणा नंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, , केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांनी हे आंदोलन चालवले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब  आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना सामाजिक गुरु मानून हे आंदोलन तहहयात चालवले.
1978 ला मान्यवर कांशीरामजी, यशकायी डी. के. खापर्डे व दीनाभानाजी यांनी व त्यांच्या
सहकार्यांनी बामसेफची निर्मिती केली ते म्हणजे सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवनच होते.
वर्तमान परिस्थितीत या आंदोलनाची प्रसंगीकता राष्ट्रीय पातळीवर आहे.
         भारत मुक्ती मोर्चाचे वतीने सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना फुले - शाहू - आंबेडकरी चळवळीतील अनुयायांना आमंत्रित करत
आहोत. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी चे मैदान, आर.टी.ओ. ऑफिस शेजारी, पुणे येथे होणाऱ्या या सामाजिक व ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चा प्रदेश अध्यक्षा प्रतिभा उबाळे, प्रदेश संयोजक सचिन बनसोडे व महिला आघाडी अध्यक्षा संगीता शिंदे यांनी केले आहे.
Comments