पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे


डॉ.गिरीश गुणे यांच्या घरातील गणपती बाप्पा
पनवेल/प्रतिनिधी :-- पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला पाहिजे. गणेशोत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली असल्याचे पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांनी संगितले.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलतो आहे.. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. गणेशोत्सवात सगळ्यात मोठा झालेला बदल म्हणजे गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा झालेला व्यापक शिरकाव तथा त्यातून निर्माण होत असलेल्या भयावह प्रदूषणाच्या समस्या. सोबतच पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, सजावटीकरिता प्लास्टिकचा वापर, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर, जास्त घातक रासायनिक रंगाचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण, या सर्वामुळे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव दरम्यान सजावट ही थर्माकॉल ऐवजी फुलांची पर्यावरण पूरक असेल अशी करावी तसेच निर्माल्याचा वापर पाण्यात नदीत न सोडता त्याचा वापर खत करण्यासाठी वापरावा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे. असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मोलाचा संदेश पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांनी दिला आहे. 

गणेशमूर्तीचे विसर्जन हे वाहत्या पाण्याऐवजी कृत्रिम गणेशकुंडात करण्याची आवश्यकता-
       
प्लास्टरच्या मूर्तीमुळे लाखों जलचरांवर, समुद्री जीवांवर मृत्युमुखी पडण्याचे विघ्न ओढवते आहे. नद्या या आपल्या जीवनदात्या म्हणून ओळखल्या जातात. पिण्याच्या पाण्याच्या सगळ्यात मोठय़ा स्रोत या नद्या व त्यावरील धरणे होत. मात्र याच नद्यांमध्ये प्लास्टरच्या मूर्तीसोबतच हजारो टन निर्माल्य विसर्जित करत मोठय़ा प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन हे वाहत्या पाण्याऐवजी कृत्रिम गणेशकुंडात करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन डॉक्टर गिरीश गुणे यांनी केले आहे.

डॉक्टर गुणे यांचाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव:

गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर गिरीश गुणे यांच्या घरी दीड दिवसाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर गिरीश गुणे यांनी दिली.
Comments