अभिजित पाटील यांची राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड ....
पनवेल:
नॅशॅनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ‘१०वी वेस्ट झोन शूटिंग स्पर्धा’ नुकतीच अहमदाबाद गुजरात येथील ‘द अहमदाबाद मिलिटरी अँड रायफल ट्रेनिंग असोसिएशन’ याठिकाणी पार पडली. यावेळी ५० मीटर प्रोन पोझिशन पुरुष गटातील स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील खेळाडू अभिजित पाटील यांची थेट राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा नोव्हेंबर २०२३ रोजी केरळ अथवा दिल्ली येथे पार पडणार असून अभिजित पाटील यांच्यावर चमकदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अहमदाबाद येथे पार पडलेल्या वेस्ट झोन निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दीव दमण, मध्य प्रदेश आदि राज्यातून सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी खेळताना अभिजित पाटील यांनी दैदिप्यमान शूटिंग स्किल्स सादर करत आता थेट राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग स्पर्धेत झेप घेतली आहे. सुरुवातीला आंतरराज्य त्यानंतर राज्यपातळी आणि आता थेट राष्ट्रीय पातळीवर धडक मारणाऱ्या अभिजित पाटील यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मागील महिन्यात पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या महाराष्ट्र एयर अँड फायरआर्म्स २०२३ स्पर्धेत रायगड, मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अभिजीत पाटील यांनी आपल्या नैपुण्याने सर्वोत्कृष्ट नेमबाजीचे दर्शन घडविले. अभिजित पाटील यांनी प्रथम फेरीत १०० पैकी ९५, द्वितीय फेरीत ९६, तृतीय फेरीत ९५, चौथ्या फेरीत ९७, पाचव्या फेरीत ९६ व अंतिम फेरीत ९८ गुण प्राप्त करीत ६०० पैकी ५७७ गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. त्यामुळेच त्यांची गुजरात येथील राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली होती.
प्रथितयश उद्योगपती, सजग राजकारणी, सेंट्रल रेल्वेच्या झोनल कमिटीचे सन्माननीय सदस्य, ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून प्राणिसेवा देणारे, अष्टावधानी गुणवैशिष्ठये असलेले अभिजित पाटील रायफल शूटिंगची आवड, छंद या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन एक पॅशन म्हणून जपतात. त्यांच्या यशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक तेजस रमेश कुसाळे यांचा मोलाचा वाटा आहे.