"माझी वसुंधरा अभियान" विभागीय कार्यशाळा संपन्न...
नवी मुंबई :- पर्यावरणातील बदल लक्षात घेता “माझी वसुंधरा अभियान 4.0” हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रीय व्हावे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.
“माझी वसुंधरा अभियान 4.0” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व आझादी का अमृत महोत्सवांतर्गत “मेरी माती मेरा देश” अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदशन देण्यासाठी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त’ आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालय व पनवेल महानगरपालिका यांच्या विद्यमाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वास्टेवाड, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. गणेश देशमुख, विभागीय वन अधिकारी ठाणे कांचन पवार, विभागीय वन अधिकारी रायगड स्वप्नील धुरे,पनवेल महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपआयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे, उपआयुक्त ( नगरपालिका प्रशासन) रविंद्र जाधव, उपआयुक्त (विकास) गिरीष भालेराव, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी ठाणे गणेश जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि.प. ठाणे प्रमोद काळे तसेच कोंकण विभागातील सर्व विस्तार अधिकारी, सर्व गट विकास अधिकारी, उपस्थित होते. कार्यशाळेच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतात्मे तसेच यासारख्या विविध दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यशाळेचा शुभारंभ झाला.
या कार्यशाळेस उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले की, हा शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी मागील वर्षाचे काम किती झाले आहे त्याचा आढावा घेऊन या वर्षी माझी वसुंधराचे काम अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. “मेरी मिट्टी मेरा देश”अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, अभियान यशस्वी करावे. माझी वसुंधरा अभियानात कोकण विभागात शंभर टक्के नोंदणी झाल्या बद्दल आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरी भागात “माझी वसुंधरा अभियान” राबविण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. श्री.देशमुख यांनी यावेळी ‘स्वच्छ भारत’ मिशनचे महत्व सांगितले. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन झाले, त्याबद्दल श्री. देशमुख यांनी आयुक्त कल्याणकर यांचे आभार मानले. आयुक्त श्री. देशमुख यांनी माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी उपस्थितांना सूचना केल्या.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियानाबाबत जिल्हा परिषद ठाण्याचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), प्रमोद काळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी श्री.काळे यांनी प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांनी “माझी वसुंधरा अभियान”संबधी दिलेल्या संदेशाचे वाचन केले.
पर्यावरण पुरक गणेशात्सवबाबत जिल्हा नियोजन अधिकारी,ठाणे सुरेश जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले. श्री.जाधव यांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत सादरीकरणासह सविस्तर माहिती दिली.
ठाणे जिल्हा उप वनसंरक्षक श्रीमती.कांचन पवार यांनी “माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत जिल्हा निहाय रोप वाटीका, वनमहोत्सव तसेच रोपांबाबत विस्तृत माहिती दिली. श्रीमती पवार यांनी कोंकणाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या जिल्हयात कोणती झाडे, फळझाडे, पिके घेता येतील यावर अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.
कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी शासकीय यंत्रणांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची प्रसिद्धी कशी करावी. शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची दखल जनसामान्यांनी घेतली पाहिजे, त्यांचे कौतुक झाले पाहिजे यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा कसा वापर करावा याबद्दल मार्गदर्शन केले. युनिसेफ महाराष्ट्र आणि विभागीय नागरी व पर्यावरण अभ्यास केंद्र, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्यातर्फे माझी वसुंधरा टूल किट मधील महत्वाचे मुद्दे उपस्थितांसमोर सादर केले.
विभागीय वन अधिकारी रायगड स्वप्निल धुरे यांनी “माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत जिल्हयाच्या भौगोलिक स्थितीनुसार वृक्ष, रोपे,निवडीबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच जीओ टॅग वृक्ष गणना बाबत मार्गदर्शन केले.
वसुंधरा टीम समन्वय यांनी “माझी वसुंधरा अभियान ४.०” अंतर्गत पंचतत्वांबाबत विस्तृत माहिती व सादरीकरण करुन या अभियानात कशाप्रकारे उत्कृष्टरित्या काम करता येईल. तसेच काम करताना येणाऱ्या अडचणींवर कसे मात करता येईल. याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियान राबवितांना येणाऱ्या अडचणी बाबत प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.