इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू...
पनवेल : राज भंडारी
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर येथील ग्रामस्थांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळणाऱ्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे किट खालापूर तहसीलदार यांच्यामार्फत रविवारी संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी दुर्घटनाग्रस्त बांधवांना दिले. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी या घटनेत दाखविलेली माणूसकी आणि उदारपणाचे दायित्व यामुळे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे आभार मानले.
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथील बांधव जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरामध्ये ४ दिवस वास्तव्यास होते. दरम्यान या दुर्घटनाग्रस्त बांधवांसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यावेळी हे सर्व बांधव श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे असल्यामुळे त्यांच्यासाठी आलेली सर्व मदत ही देखील त्याठिकाणी होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्यावतीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आल्यामुळे ही सामुग्री श्री क्षेत्र पंचायत मंदिर येथे राहिली. यावेळी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या सूचनांनुसार मदतीसाठी आलेली साधनसामुग्री दुर्घटनाग्रस्त बंधवांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानुसार संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी या समुग्रीमधील जीवनावश्यक खाण्याच्या वस्तूंचे छोटे छोटे किट बनवून तहसीलदार खालापूर यांच्या मार्फत दुर्घटनाग्रस्त बंधवणपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
कोट
इर्शाळवाडी येथे घडलेली दुर्घटना ही अंगावर काटा आणणारी घटना होती. येथील बंधू, भगिनी आणि लेकरांच्या वाट्याला.आलेलं दुःख कोणावरही येवू नये. आम्ही सतत या बांधवांसोबत असताना त्यांना जवळून अनुभवले आहे. आम्ही आमच्या परीने जितके करता येईल तितके आम्ही करत राहणार आहोत, मात्र श्री क्षेत्र पंचायत मंदिर येथे या बांधवांची व्यवस्था केली असताना जी मदत त्यांच्यासाठी आली होती, ती त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी म्हणून आम्ही सदर साधन सामुग्री खालापूर तहसीलदार यांच्यामार्फत दरडग्रस्त बंधवांपर्यंत पोहोचविली आहे.
- प्रितम जनार्दन म्हात्रे,
अध्यक्ष, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था