अंतिम सामन्यातील सुपर ओवरमध्ये रोटरी वॉरियर्सचा पनवेल स्ट्रायकरवर रोमहर्षक विजय...
 पनवेल स्ट्रायकरवर रोमहर्षक विजय...


पनवेल / वार्ताहर : - रायगड क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन आयोजित जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत सह पुरस्कृत एमडी फाउंडेशन माननीय महेंद्र दळवी यांच्या सहयोगाने आयोजित आरसीसीएल 2023 या स्पर्धेतील दुसऱ्या पर्वातील अंतिम सामन्यातील सुपर ओवरमध्ये रोटरी वॉरियर्सचा पनवेल स्ट्रायकरवर रोमहर्षक विजय.


रायगड स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनतर्फे, रायगड जिल्ह्यातील जेएनपीटीच्या उरण येथील उत्कृष्ट मैदानावर सलग दुसऱ्या वर्षी T20 रायगड क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2023 या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेचे आयोजन 20 मे 2023 ते 1 जून 2023 दरम्यान करण्यात आले होते. 13 दिवस चाललेल्या ह्या स्पर्धेत दहा संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेतील अंतिम सामना दिनांक 1 जून 2023 रोजी रोटरी वॉरियर्स विरुद्ध पनवेल सुपरस्ट्रायकर्स असा झाला.
पनवेल सुपरस्टायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विनय ठाकूर व आशिष माळी या आघाडीच्या फलंदाजांनी डावाला सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात 20 धावा निघाल्यानंतर सुनील सरगर या ऑफस्पिन गोलंदाजाला पाचारण करण्यात आले. ही चाल यशस्वी करत सुनीलने आपल्या पहिल्याच ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर विनय ठाकूरला 14(12 चेंडु, 3 चौ.) यष्टीरक्षक पंकज पाटीलकडे  झेल देण्यास भाग पाडत 21 धावांवर संघाकरता पहिला बळी प्राप्त केला. त्यानंतर आलेल्या निशांत माळी बरोबर आशिष माळीने अजून एक आक्रमक अशी पण छोटीशी 14 चेंडूत 27 धावांची भागीदारी नोंदवली. संघाची 48 धावसंख्या झाली असताना एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अभिषेक श्रीवास्तवने कव्हर्समधून गोलंदाज सुनिलकडे अचूक फेक करत निशांतला धावचित केले. नंतर आलेला केतन मेहेरही चार धावांच्या अंतराने धावचित झाला. 
पनवेल सुपरस्टायकरकरची धावसंख्या झाली होती 6.1 षटकात 3 बाद 52. संकेतच्या पुढच्याच चेंडूवर आशिष माळी देखील बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या सुनीलकडे झेल देत बाद झाला. 
पनवेल सुपरस्ट्रायकर 6.2 षटकात 4 बाद 53. सहाव्या क्रमांकावर आलेल्या सिद्धेश दळवीने इम्पॅक्ट प्लेयर अशय मदने बरोबर वीस धावांची भागीदारी करत डाव सावरण्याच्या प्रयत्नात असताना 72 धावसंख्येवर कर्णधार सुनीलने अशयला त्रिफळाचीत करत स्वतःचा दुसरा व संघाकरताचा पाचवा बळी मिळवला. सातव्या क्रमांकावर आलेल्या कुणाल नाईकने सिद्धेश बरोबर 17 चेंडूत 21 धावांची भागीदारी नोंदवली. संघाच्या 93 धावा संख्येवर सिद्धेश धावचित होऊन परतला. त्यानंतर आलेले आशिष गुप्ता व प्रथमेश कोळी देखील झटपट तंबूत परतल्याने पनवेल स्ट्रायकरची धावसंख्या झाली होती 15.2 षटकात 8 गडी बाद 100 धावा. नवव्या गड्याकरता कुणालने जुगल घरत बरोबर 22 चेंडूत 27 धावा जोडल्या. संकेतने जुगलला अभिषेक करवी झेलबाद करत 127 धावसंख्येवर नववा बळी मिळवला. कुणाल एका बाजूला 32 धावांवर नाबाद होता. शेवटच्या षटकात रत्नदीप चौधरीने पाच चेंडूत एक षटकार व एक चौकार मारत नाबाद 12 धावा काढल्या व संघाची धावसंख्या 20 षटकात 142 पर्यंत पोहोचवली. कुणाल नाईक सातव्या क्रमांकावर येऊन 29 चेंडूत 33 धावा काढून नाबाद राहिला.

रोटरी वॉरियर्सच्या अभिषेक श्रीवास्तव व रुद्राक्ष गोवारी या डाव्या उजव्या जोडीने डावाला सुरुवात केली. लक्षाचा  पाठलाग करताना दोन्ही फलंदाजांनी विशिष्ट योजनेनुसार अप्रतीम खेळ करत 44 चेंडूत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. 46 चेंडूत दुसरे अर्धशतक साजरे करत 15 षटकात बिनबाद 100 धावांची सुरुवात संघाला करून दिली. त्यावेळी रुद्राक्ष 46 चेंडूत 51 धावा व अभिषेक 44 चेंडू 41 धावांवर नाबाद होते. हेच दोन्ही फलंदाज सामना जिंकून देतील असे वाटत असतानाच सोळाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रुद्राक्ष बाद झाला. सिद्धेशच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटला रत्नदीपने त्याचा उत्कृष्ट झेल घेतला. रोटरी वॉरियर्स 15.2 षटकात एक बाद 101. अजूनही रोटरी वॉरियर्सला 28 षटकात 42 धावांची जरुरी होती. त्याच षटकात सिद्धेशने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संकेतला एक चेंडू नंतर शून्यावर त्रिफळाचीत केले. रोटरी 2 बाद 101. पुढील दोन षटकात रोटरीचे आणखी तीन फलंदाज 21 धावांच्या अंतराने तंबूत परतल्याने सामना खूपच रोमांचक स्थितीत पोहोचला. अजूनही रोटरीला 14 चेंडूत 21 धावांची जरुरी होती. त्यावेळी एक बाजू लावून धरणारा अभिषेक 48 चेंडूत 51 धावांवर नाबाद होता. अठराव्या शतकात रोटरीचा धावफलक होता 5 बाद 126. अजूनही रोटरी वॉरियर्सला 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता होती. एकोणिसाव्या शतकात आलेल्या विनय ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी करत फक्त तीन धावा दिल्या. रोटरी वॉरियर्स 19 षटकात 5 बाद 129. शेवटच्या सहा चेंडूत 14 धावांची आवश्यकता. रत्नदीपने टाकलेल्या पहिल्या पाच चेंडूंवर  अभिषेक व सुनील चावरी यांनी १२ धावा वसूल केल्या. आता शेवटच्या  चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना कव्हरमध्ये तटवलेल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करून दुसरी विजयी धाव घेताना विनयच्या उत्कृष्ट फेकीने अभिषेक धावचित झाला.   रोटरी वॉरियर्सची धावसंख्या देखील 20 षटकात सहा बाद 142 झाल्याने सामन्यात बरोबरी झाली व सामना सुपर ओवरमध्ये पोहोचला.

सुपर ओवर मध्ये प्रथम फलंदाजी करताना रोटरी वॉरियर्सने एका षटकात 21 धावा केल्या. प्रत्युत्तरात पनवेल स्ट्रायकर्सला फक्त पाचच धावा करता आल्या.  ज्यामुळे रोटरी वॉरियर्स या स्पर्धेचा विजयी संघ ठरला.
अभिषेक श्रीवास्तव या अंतिम सामन्याचा सामनावीर तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट फलंदाज ठरला. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक रोटरी वॉरियर्सचा कर्णधार सुनील सरगर याने पटकावले.

माननीय प्रीतम म्हात्रे (जे एम चॅरिटेबल ट्रस्ट), आमदार महेंद्र दळवी( एम.डी. फाऊंडेशन),  महेंद्रजी घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉ.मनिष पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योजक लंकेश ठाकूर, अजितजी ठाकूर,  सुधीरजी घरत कामगार नेते या पुरस्कर्त्यांमुळे, दहा संघ मालकांच्या सहकार्यामुळे व जेएनपीटी उरण यांनी उपलब्ध करून दिलेल्या मैदानामुळे हे शिवधनुष्य रायगड स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनला उचलता आले. 

अतीशय कमी वेळेत व आयत्यावेळी उद्भवलेल्या असंख्य अडचणींवर मात करत, दुसऱ्या पर्वातील आरसीसीएल 2023 ही स्पर्धा, रायगड स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष किरीट पाटील, उपाध्यक्ष प्रीतम कैया व संदीप पाटील, खजिनदार सुहास हिरवे, सदस्य प्रज्ञेश पावसकर यांच्या अथक प्रयत्नांनी व  रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष  प्रदीप नाईक व उपाध्यक्ष प्रकाश पावसकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यास यश लाभले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image