प्रत्यारोपणासाठी भासणारी अवयवांची कमतरता ठरतेय जागतिक समस्या...
मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि झेडटीसीसी, मुंबईच्या वतीने अवयवदानाविषयी जनजागृतीपर परिसंवाद

नवी मुंबई: अवयव दानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई तसेच झोनल ट्रान्सप्लांट को ऑर्डिनेशन सेंटर (ZTCC), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 20 मे रोजी सीबीडी बेलापूर येथील द पार्क हॉटेल येथे एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. झेडटीसीसी महाराष्ट्र सरकार, पोलीस,  कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणारे वकील, वैद्यकीय व्यवसायिक तसेच नवी मुंबई व रायगड परिसरातील हॉस्पिटलचे डॉक्टर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अवयवदान ही काळाची गरज आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने आठ व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. प्रत्येकाला चांगले जीवन जगता यावे याकरिता यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुस, आतडे आणि हात अशा अवयवांची नितांत गरज असते आणि हे अवयव  दान करता येतात जेणेकरुन गरजू व्यक्तींना याचा लाभ घेता येईल. एक जिवंत व्यक्ती देखील एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचे शरीराचे अवयव जसे की मूत्रपिंड, अस्थिमज्जा, यकृत आणि फुफ्फुसाचे काही भाग दान करू शकते.

व्यक्तीचे अवयव (मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस इ.) निकामी झाल्यामुळे त्यांना त्यांचा मौल्यवान जीव गमवावा लागतो आणि अशा व्यक्तींचे प्राण वेळीच अवयव प्रत्यारोपण केल्याने वाचविता येऊ शकतात. प्रत्यारोपणासाठीचे अवयव हे जिवंत दाता (मूत्रपिंडासाठी किंवा यकृताचा काही भाग) आणि ब्रेन स्टेम डेथ व्यक्तीकडून येतात. ब्रेन डेड व्यक्तीकडून 8 अवयव (2 मूत्रपिंड, 1 यकृत, हृदय, 2. फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे,) मिळू शकतात त्यामुळे 8 व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे अवयवदानाबद्दल लोकांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. अवयवदानाची गरज समजून रक्तदात्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले पाहिजे.

अवयवदानाचे उदात्त कृत्य करून अवयव निकामी झालेल्या व्यक्तीला नवीन जीवन देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात अवयवदान संदर्भातील सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मी स्वतः अवयव दान करण्याचे वचन घेत असून प्रत्येकाने अवयवदान याकरिता पुढे यावे असे  प्रतिपादन झेडटीसीसी मुंबईचे अध्यक्ष डॉ. एस.के. माथूर यांनी केले.
 
महाराष्ट्र सरकारचे डॉ अरुण यादव यांनी सांगितले की, आजच्या जगात, जिथे वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली आहे, तिथे अवयव दान ही काळाची गरज बनली आहे. अवयव प्रत्यारोपणामुळे जीवघेणा आजार असलेल्या रुग्णांना त्यांचे आयुष्य परत मिळविण्याची  आणि पुन्हा सामान्य जीवन जगण्याची संधी मिळते. प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता ही जागतिक समस्या असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अवयवदानाची प्रक्रिया सोपी आहे आणि ती वेळखाऊ देखील नाही; यामध्ये अवयव दाता म्हणून नोदणी करत आणि तुमच्या इच्छा तुमच्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत कळविणे आवश्यक आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढवण्याची हीच योग्य वेळ असून प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
 
देशात अवयवांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु, प्रत्यारोपणासाठी अवयव अद्यापही उपलब्ध नाहीत. या वाढत्या मागणीसह, ब्रेन डेड अवयव दात्यांचे व्यवस्थापन आणि त्यांसबंधीच देखभाल घेणे देखील आवश्यक आहे. अवयवदात्याचे योग्य वैद्यकीय व्यवस्थापन यशस्वी अवयव प्रत्यारोपण सुनिश्चित करण्यासाठी बहु-अनुशासनात्मक कार्यसंघ दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.

डॉ. विक्रम राऊत, यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया संचालक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई सांगतात की, भारतातील अवयवदानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कायदे, कौटुंबिक संमती, सतर्कता आणि पायाभूत सुविधांबद्दल जनजागृतीच्या अभावामुळे भारतात अवयवदानाची कमतरता भासत आहे. प्रत्यारोपणाची परिस्थिती सुधारण्यासाठी अवयव दान आणि प्रत्यारोपण संबंधीत उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. रुग्णाच्या यशस्वी परिणामांसाठी योग्य समन्वय साधता येणे आवश्यक आहे. भारतात अवयवदानाच्या दाता-प्राप्तकर्ता मधील तफावत दूर करणे गरजेचे आहे. या परिसंवादाला उत्तम प्रतिसाद लाभला असून भविष्यात अशा प्रकारच्या अनेक अवयवदान मोहिम, चळवळी आणि कार्यक्रम घेऊन येण्याचा आमचा निर्धार आहे.
Comments