घंटागाडी कामगारांना मिळाला थकीत पगार...
पनवेल दि.२९ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टी प्रणित छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेच्या पाठपुरावामुळे नवी मुंबई महानगर पालिकेच्या घंटागाडी कामगारांना त्यांचा थकीत पगार मिळाला आहे. यासाठी सर्व कामगारांनी युनियनचे अध्यक्ष संजय पवार आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांचे आभार मानले.
नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्दतीने काम करणाऱ्या काही घंटागाडी कामगारांचे पगार कंत्राटदाराने गेल्या तीन महिन्यांपासून थकवले होते. यामुळे या कामगारांना आर्थिक चणचण भासत होती. याबाबत त्यांनी कंत्राटदार आणि प्रशासनाकडे दाद मागितली मात्र त्यांच्या दादला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे अध्यक्ष संजय पवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली. संजय पवार यांनी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांना या कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दिनेश ठाकूर यांनी संबंधित कंत्राटदार आणि पालिका प्रशासनासोबत चर्चा आणि पाठपुरवठा सुरु केला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे दिले आहेत. याबद्दल या कामगारांनी युनियनचे अध्यक्ष संजय पवार आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
फोटो : संजय पवार यांचे आभार मानताना कर्मचारी