पनवेल वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
पनवेल वैभव / दि २४ ( संजय कदम ) : जेएनपीटी रोडवरील मानघर ब्रिजच्या वर पिकअप आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता, मात्र पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आली आहे.
सदर अपघात घडल्यानंतर पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पवार, पोलीस हवालदार यादव, पोलीस हवालदार पवार, पोलीस नाईक केशव निकम आणि एमएसएफच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे क्रेन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी रस्त्यावरील अडथळा दूर केला आणि विस्कळीत झालेली वाहतूक तात्काळ सुरळीत केली.
फोटो - अपघात मदत