पनवेल जवळील महिला बांधकाम व्यावसायिकावरील गोळीबार प्रकरण आता क्राईम ब्रांचकडे....
पनवेल दि.१४ (वार्ताहर) : पनवेल जवळील एका बांधकाम व्यावसायिक महिलेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील या महिलेवर गोळीबार करणाऱ्याबाबत पनवेल शहर पोलिसांना काहीच धागेदोरे न सापडल्याने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार आता या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष आणि गुन्हे शाखा युनिट दोन कडून करण्यात येणार आहे.
उरण तालुक्यातील कोप्रोली गावात राहणाऱ्या सुप्रिया मंगेश पाटील (३०) या पनवेल येथील आपले रियल इस्टेटचे कार्यालय बंद करुन त्या कारमधून घरी परतत होत्या. यावेळी जुन्या उरण रस्त्यावरुन जात असताना बांबवीपाडा येथे अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्यावर गोळी झाडली होती. यावेळी गोळी कारमधून घुसून डाव्या पायाला लागल्याने सुप्रिया पाटील जखमी झाल्या. त्यावेळी कार तिचा चुलत भाऊ सर्वेश म्हात्रे चालवत होता. त्याने जखमी सुप्रिया पाटील यांना बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
सदर गोळीबाराच्या घटनेला आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, पनवेल शहर पोलिसांना या प्रकरणात काहीच धागादोरा सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, जखमी सुप्रिया पाटील यांनी दुखापतीमुळे अनेक दिवस पोलिसांकडे कोणतीही स्टेटमेंट दिली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे कठीण झाले होते. अद्याप देखील त्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ज्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या प्रकरणातील आरोपींबाबत माहिती मिळणे कठीण झाले आहे. तक्रारदार महिलेने देखील या प्रकरणात जास्त माहिती उघड केली नसल्याने तपासात अडचणी येत असल्याचे पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर आठवडाभरानंतरही देखील सुप्रिया पाटील यांनी माहिती न दिल्यामुळे गोळीबार करण्यासाठी किती लोक आले होते ? ते कशावरुन आले होते? याबाबत पोलिसांना माहिती नव्हती. मात्र, नंतर सुप्रिया पाटील यांनी गोळीबार करणारा एकच व्यक्ती असल्याचे तसेच तो चालत आल्याची माहिती नंतर दिली. तसेच गोळीबार करणाऱ्याने हुडी घातली असल्याने त्याने दरवाज्यावर गोळी झाडून तेथून पलायन केले. त्यामुळे त्याचा चेहरा दिसला नसल्याचे सुप्रिया पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, उरण मधील एका व्यक्तीने सुप्रिया पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. मात्र, सदर प्रकरण नुकतेच आमच्याकडे वर्ग झाल्यामुळे आम्ही त्याला बोलावून त्याची चौकशी करु, अशी माहिती गुन्हे शाखेतील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.