पनवेलचे आराध्यदैवत,श्री जाखमाता (गावदेवी) देवीची पालखी प्रदक्षिणा १ एप्रिल रोजी....
पनवेलची आराध्यदैवत, श्री जाखमाता (गावदेवी) देवीची पालखी १ एप्रिल रोजी....
पनवेल वैभव / दि.३१ (संजय कदम) : पनवेलची आराध्यदैवत, नवसाला पावणारी, संकटी हाकेला धावणारी श्री जाखमाता (गावदेवी) देवीची पालखी परिक्रमा सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन शके १९४४ चैत्र शके १९४५ शनिवार दि.०१ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होणार आहे.       
                         
पनवेलची जागृत माता अन् पनवेलकरांचे संकटापासून रक्षण करणाऱ्या देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. नवसाला पावणारी व रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमातेवर पनवेलवासीयांची अपार श्रद्धा आहे. पनवेलवासियांचे रक्षण करणारी गावदेवी माता म्हणून ती प्रसिद्ध आहे. या देवीच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार ३५ वर्षांपूर्वी केला गेला आहे. या वर्षी या जाखमाता देवीची (गावदेवीची) पालखी सोहोळा १ एप्रिल रोजी आहे. 
या वेळी अन्नदानाचे देखील आयोजन केल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. १९४२ ते ४५ च्या कालावधीत पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. तिला घाबरून अनेकांनी पनवेल गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्यांची जाखमातेवर श्रद्धा होती. असे भक्त देवीच्या मंदिर परिसरात वास्तव्य करून राहिले. त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा कोणताही परिणाम झाला नाही, असे सांगितले जाते. त्यावेळी देवीची पालखीतून मिरवणूक काढली. या दृष्टान्तपासून जाखमाता देवीचे महात्म्य पनवेलच्या आजुबाजूच्या गावात पोहोचले. तेव्हापासून पनवेलची जाखमाता देवी ही भक्तांची माता म्हणून हृदयस्थानी अढळ झाली. त्या दिवसापासून दरवर्षी चैत्र महिन्यात पालखीचा सोहोळा केला जातो. तो रात्री ९ वाजेपासून सुरू होतो. संपूर्ण पनवेलमधून फिरून पहाटेपर्यंत देवळात पालखी आणण्याची प्रथा गेल्या सात ते आठ दशकांपासून सुरू आहे. नवरात्रोत्सवही भक्ती भावाने अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे. या वेळी नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते, चैत्र महिन्यात निघणारी पालखी व अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सव हे दोन उत्सव दरवर्षी साजरे केले जातात.





फोटो : जाखमाता
Comments