तब्बल २७ वर्षांनी भेटले "१९९७ बीएससी पासआउट" मित्र....
होळी अगोदरच अनुभवली मैत्रीच्या रंगांची धुळवड...

पनवेल/ प्रतिनिधी
       तब्बल २७ वर्षांनी बीएससी पास झाल्यानंतर पनवेल मध्ये एकच वर्गातील मित्र भेटले होते. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून (डोंबाळा कॉलेज) १९९७ साली बीएससी पास झालेले हे मित्र २७ वर्षानंतर आपल्याच मित्रांच्यात ओळखीच्या खुणा शोधत होते. एव्हाना पंचेचाळीशी पार केलेल्या या बॅचमेट्स मध्ये वाढती वये डोकावत होती. त्यामुळे अमुक अमुक ना रे तू? असे म्हणत एकमेकांना कडकडीत मिठ्या मारत स्वागतसमारंभ रंगला.होळीच्या अगोदरच मैत्रीच्या रंगांची उधळण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळे होळीच्यापूर्वी धुळवड साजरी केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
         
पनवेल तालुक्यातील वार्दोली नजीक दृष्टी फार्म हाऊस येथे हे गेट-टुगेदर रंगले होते. याच बॅचमधील समीर आंबवणे आणि काही मित्र साधारणपणे दोन वर्षांपूर्वी गुळसुंदे हायस्कूल मधून एस एस सी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गेट-टुगेदर मध्ये भेटले होते. पावणेतीन दशकांनी एकत्र भेटणाऱ्या मित्रांच्यात एक अभूतपूर्व उत्साह होता. अशाच पद्धतीने आपल्या बारावी आणि बीएससी बॅचचे गेट-टुगेदर करता येईल काय? याची चाचपणी ही सारी मंडळी तेव्हापासून करू लागली. त्यानंतर सार्स कोव्ह १९ विषाणू संक्रमणाच्या मुळे लादलेल्या टाळेबंदीच्या कालखंडात टेलिफोन वरून एकमेकांची ख्याली खुशाली विचारण्याच्या उद्देशाने १९९७ साली बी एस सी उत्तीर्ण झालेल्या सदस्यांचे कॉन्टॅक्ट नंबर जमू लागले. हे गेट-टुगेदर घडवून आणायचेच या विचाराने झपाटून गेलेल्या समीर आंबवणे सोबत तेव्हा नांदगाव रहिवासी राजेश हुद्दार,नवीन पनवेल चे किसन खार्के, गव्हाण येथून भालचंद्र गवंडी, गुरुदत्त कांबळे, नंदकुमार मुंबईकर, विनोद तारेकर, मंदार करंदीकर असे सवंगडी जमा झाले.
           
प्राप्त बॅचमेट्स चे नंबर घेऊन व्हाट्सअप ग्रुप ची निर्मिती करण्यात आली. जस जसे संपर्क क्रमांक मिळत गेले तसतसा ग्रुप वाढत गेला, फुलत गेला. आपापले व्यवसाय-रोजगार सांभाळत बिनीचे शिलेदार सुट्टीच्या दिवशी गेट-टुगेदर च्या आयोजनासंदर्भात भेटत होते. तब्बल २७ वर्षांनी वर्गमित्र भेटणार! या नुसत्या कल्पनेने ग्रुप मध्ये उत्साह दणाणला होता. सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल प्रेझेन्स वरच जुन्या आठवणींचा हलकल्लोळ उडाला होता. प्रत्यक्ष भेटीपूर्वीच व्हाट्सअप संभाषणाच्या माध्यमातून असा काही माहोल तयार झाला की प्रत्येक जण १९९७ च्या कालखंडात जाऊन पोहोचला होता. पनवेल तालुक्यातील  वार्दोली नजीक दृष्टी फार्म हाऊस हे ठिकाण ठरले आणि गेट-टुगेदरची तारीख जाहीर झाली ५ मार्च २०२३...
      
रविवार ५ मार्च रोजी पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व सदस्य सकाळी जमले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांना अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून मित्रमंडळी फार्म हाऊस च्या दिशेने रवाना झाली. प्रत्येक सदस्याच्या खिशाला टवटवीत गुलाब पुष्प डकविण्यात आले.मंदार करंदीकर यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक सदस्यासाठी नामोल्लेख असणारे स्वागताचे बॅज बनविले होते.तुतारी च्या सलामीने प्रत्येक सदस्याचे दणकेबाज स्वागत करण्यात आले.शाल, पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन प्रत्येक बॅचमेट चा सन्मान करण्यात आला. सगळेच मित्र! त्यामुळे कुणीही जेष्ठ नाही,की श्रेष्ठ नाही! असे म्हणत एकदा सन्मान घ्यायचा आणि पुढच्या मित्राचा सन्मान करायचा अशा खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत समारंभ बहरला.समिर अंबावणे (सर) यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.त्यानंतर प्रत्येक जण पदवी प्राप्त केल्यानंतर आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल,आपल्या कुटुंबाबद्दल, त्याच्या अचीवमेंट बद्दल बाकी सगळ्यांशी भरभरून बोलत होता.यातील प्रत्येकाने संघर्षाची कास धरत, परिस्थितीशी दोन हात करत समाजात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले होते. आपल्या मित्राने प्राप्त केलेल्या यशाच्या कौतुकासाठी उपस्थित सगळेच टाळ्या शिट्ट्यांच्या माध्यमातून त्याला शाबासकी देत होते.
           
त्यानंतर बॅकबेंचर्स, स्कॉलर, स्पोर्ट्स पर्सन, खासमखास असे जिवलग कंपू करून सेल्फी उत्सव साजरा करत होते.किस्से,कहाण्या,लेग पुलिंग यांनी हास्याचे गडगडाटी सात मजली इमले निर्माण झाले होते. गाणी,कविता,स्वानुभव कथन यांनी मित्र पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत गेले. मैत्रीचे प्याले एकमेकांवर हिंदकळत दोस्तीची झिंग अनुभवणाऱ्या कंपनीमध्ये तर जणू काही विचारवंतांची गोलमेज परिषद भरली होती.सात्विक आणि सामिष भोजनावर ताव मारण्याऐवजी एकमेकांना आग्रह करण्यात जेवणावळीच्या पंगती उठल्या.विनोद तारेकर याने घरून बनवून आणलेल्या जेवणाची अफलातून लज्जत सगळ्यांनी अनुभवली. एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर घेत पुन्हा एकमेकांना भेटण्याच्या आणा-भाका घेत, एक न भूतों न भविष्यती अशी आठवण उरामध्ये साठवत निरोप घेण्यास सुरुवात झाली.
         
वास्तविक मित्रांना भेटण्याची ओढ इतकी जबरदस्त होती की कुणी बोईसर वरून आला होता, कुणी आपल्या कंपनीचे दिल्लीचे काम तीन दिवसाऐवजी दोन दिवसात उरकून आला होता, कुणी  आई माऊली एकवीरा देवीचे येथे सुरू असलेला कुटुंबाचा नवस कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून धापा टाकत आला होता,तर या बॅच सोबत पदवी घेता न येणारा सुद्धा मित्रांच्या प्रेमापोटी आवर्जून आला होता. नजीकच्या काळात आपल्या बॅचमधील मुली, आपल्याला शिकविणारे प्राध्यापक त्या साऱ्यांच्या समवेत सहकुटुंब स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचे समीर आंबवणे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. 
        
समीर आंबवणे, राजेश हुद्दार, किसन खार्के, भालचंद्र गवंडी, गुरुदत्त कांबळे, नंदकुमार मुंबईकर, विनोद तारेकर, मंदार करंदीकर,वासुदेव ठाकूर,अमित जोशी, घनश्याम भगत,गुरुनाथ वालीलकर, सुनील खुटले,धनंजय कावडकर,उदय शेळके, रविन्द्र म्हात्रे,रमेश पाटील,विनोद पाटील,संतोष मोकल,नरेश खूटले,संतोष चौधरी, प्रविण ठाकूर,नंदकुमार म्हात्रे,अनिल मोकल, अनिल गोंधळी,सचिन देशमुख,एकनाथ भोईर, सुशिकांत तारेकर,विनोद तारेकर, सागर खुटले, शिवाजी केसरकर,गिरीश देशमुख,सत्यवान पाटील, दिलीप आगलावे,सचिन जळे,सचिन केणी, जिवन माळी,दत्ता गावंड, सुनिल पवार, अमोल गोवारी,विजय खिल्लारे,राजेश पाटील, मंदार दोंदे,अविनाश गावंड, बाळकृष्ण पाटील, प्रशांत पाटील,वसंत भोईर, प्रविण खोल्लम,उदय लोटनकर,केदार मुंढे,राजन पाटील,संजय घरत, अभय पाटील,योगेश वाणी,आनंद जितेकर, महादेव कांबळे,सचिन कल्याणकर, दिपक डाउर, नरेश मुसळे,मनोज गोळे आदींनी या अभूपूर्व स्नेह संमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image