महिला सहाय्यता कक्षात तक्रारदार पीडित महिलांनी निसंकोचपणे तक्रार देण्यास यावे - वपोनि विजय कादबाने
निसंकोचपणे तक्रार देण्यास यावे - वपोनि विजय कादबाने 

पनवेल दि.१२ (संजय कदम): महिलांना शहर सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यावर कायदेशीर कारवाई करून न्याय देणे या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू करण्यात येत आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून पनवेल शहर पोलीस ठाण्यात सुद्धा महिला सहायता कक्ष उभारण्यात आले असून या ठिकाणी तक्रारदार पीडित महिलांनी निसंकोचपणे तक्रार देण्यास यावे असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला दक्षता समितीच्या बैठकीत केले. 

या बैठकीला वपोनि विजय कादबाने यांच्यासह महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक मोनिका चौधरी, गोपनीय विभागाचे संजय धारेराव, किरण सोनावणे यांच्यासह महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महिला दक्षता समितीच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थिती महिलांना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित समितीच्या सदस्यांनी आपल्या अडी अडचणी बैठकीत मांडल्या. यावेळी मार्गदर्शन करताना वपोनि विजय कादबाने यांनी सांगितले की, महिलांच्या समस्या समजून घेणे, त्यावर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याच्या उद्देशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू  करण्यात आले आहे. सहाय्यता कक्षामध्ये एक महिला अधिकारी आणि तीन कर्मचारी तैनात राहतील. महिला आणि मुलींच्या संबंधातील सर्व प्रकारच्या तक्रारी सहायता कक्षातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हाताळल्या जाणार आहेत. अनेकदा पीडित महिला या पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर लैंगिक छळ, बलात्कारासारख्या घटनांची माहिती देताना संकोच करतात, मात्र हा कक्ष सुरू झाल्यानंतर त्यांना निसंकोच तक्रार करता येणार आहे. या तक्रारी स्वीकारण्यासाठी चोवीस तास महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.तरी या संदर्भात दक्षता समितीच्या सदस्यांनी समाजामध्ये जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले. 

फोटो: वपोनि विजय कादबाने उपस्थितांना मार्गदर्शन करताना
Comments