मराठी ही सर्वसामान्यांची भाषा - कवी अशोक नायगावकर...

महात्मा फुले महाविद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा...

पनवेल दि. ०१ (वार्ताहर) :  मराठी ही सर्वसामान्यांची भाषा आहे, म्हणून तर तिचा गोडवा सर्वदूर गेला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांनी महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल आयोजित मराठी भाषा गौरव दिन समारंभास केले.
        या कार्यक्रमाला महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिती महाजन, उपप्राचार्य प्रा. आर.ए.पाटील, नवीन पनवेल कोमसापच्या कवयित्री जोत्स्ना राजपूत, स्मिता गांधी, गणेश म्हात्रे, रामदास गायधनेे उपस्थित होते.यापुढे बोलताना अशोक नायगावकर म्हणाले, भाषा बोलण्यासाठी स्वतःला सुधारा. मराठी माणसांनी हिंदी बोलण्याची पध्दत प्रचलित केली आहे, हा आपल्यासाठी धोका आहे त्यामुळे मराठीतूनच बोलत जा. सर्व व्यवहार मराठीतूनच केले पाहिजे असे सांगून संतपरंपरेपासून संपन्न झालेेली मराठी ही जागतिक स्तरावर बोलली जाणारी एक मोठी भाषा आहे. मराठीचे विविध अंग आहेत, विविध साहित्य आहेत. तरूणांनी त्याचे वाचन करावे असे आवाहन त्यांनी केले. अशोक नायगावकर यांनी आपल्या कविता या प्रसंगी सादर केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, मराठी भाषेच्या साहित्याचा ठेवा महाराष्ट्रातील साहित्यिक पुढे नेत आहेत. सर्व गुण संपन्न असलेली मराठी भाषा आज मोठ्या प्रमाणात अमराठी भाषिक सुध्दा बोलतात ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेचा गोडवा जगात आहे. जगातील अनेक भाषांपैकी मराठी ही एक महत्वाची भाषा आहे. आजच्या पिढीने आपल्या या मराठी भाषेचा वारसा जपावा असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर व प्राचार्या डॉ. प्रिती महाजन यांचा कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषेविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या प्रेरणा भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेच्या या विशेषकांची माहिती प्रा. शरयू नाईक यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, प्रा. प्रविण गायकर, प्रा. शरयू नाईक यांनी केले. तर आभार डॉ. प्रा. सोनू लांडे यांनी मानले.
फोटो - कोमसाप तर्फे मराठी भाषा गौरव दिन
Comments