प्रतिकृती चंद्रपूर वनस्पती उद्यानास अर्पण...
पनवेल दि.०४ (संजय कदम) : ओरॉयन मॉलने प्रायोजित केलेली आणि संस्कार भारतीच्या संकल्पनेतून साकारलेली आयएनएस विक्रांत या भारतीय युद्धनौकेची प्रतिकृती मंत्रालयातील प्रदर्शनानंतर चंद्रपुरातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार संस्कार भारती आणि ओरायन मॉलने आयएनएस विक्रांतची ही प्रतिकृती विसापूर वनस्पती उद्यानास भेट देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांचे आभार मानले आहे.
ओरॉयन मॉल सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून निरनिराळे प्रकल्प राबवित असतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेलच्या ओरायन मॉल आणि संस्कार भारतीच्या पुढाकाराने आयएनएस विक्रांतची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली संपूर्ण बनावटीची विमानवाहू नौका आहे.भारताच्या ऐतिहासिक युद्धात आयएनएस विक्रांतची महत्वाची भूमिका राहिली आहे. लोकांच्या मनामनात राष्ट्र भक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेलमधील ओरियन मॉल मध्ये आयएनएस विक्रांतची प्रतिकृतीचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन झाले. भारताची पहिली युद्धनौका म्हणुन ओळख असलेल्या या युद्धनौकेच्या चलचित्रांचे प्रदर्शन देखील ओरियन मॉल मध्ये भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला पनवेलकरांचा लाभलेला प्रतिसाद पाहून आणि राज्यभरातील विविध प्रसारमाध्यम आणि वृत्तपत्राने देखील याची दखल घेतली. राज्यातील कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना या भारताच्या या ऐतिहासिक युद्धनौकेची माहिती यावी यासाठी शासनाच्या वतीने मंगेश परुळेकर यांना विनंती करण्यात आली. त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या प्रतिकृतीची पाहणी करत ओरियन मॉल आणि संस्कार भारतीचे कौतुक केले होते. आयएनएस विक्रांतची माहिती विदर्भातील जनतेपर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिकृती चंद्रपूर येथील विसापूरच्या वनस्पती उद्यानात ठेवण्याचा मनोदय मंगेश परुळेकर यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यांच्या विनंतीला ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर, संस्कार भारतीचे दीपक करंजीकर, श्रीहरी कुलकर्णी आणि सुरेश चव्हाण यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. ओरायन मॉलच्या दातृत्वामुळे आता ही प्रतिकृती विसापूरच्या वनस्पती उद्यानात स्थापित करण्यात येणार आहे. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे.
फोटो : मंगेश परुळेकर यांची भेट घेऊन आभार मानताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार