पनवेलची आयएनएस विक्रांत जहाज प्रतिकृती मंत्रालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उदघाटन ....


१२ ते २० जानेवारीपर्यंत मंत्रालयात प्रदर्शन; आमदार प्रशांत ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती ...
पनवेल(प्रतिनिधी) नौदलाचा बाहुबली, देशाची ताकद वाढणारा आणि शत्रूला धडकी भरणाऱ्या आयएनएस विक्रांत जहाजाची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. ०७) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
         संस्कार भारती (कोकण प्रांत) व ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका 'आयएनएस विक्रांत'च्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे दिनांक १२ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंचरत्न हॉटेल येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, संस्कार भारतीचे अँड. अमित चव्हाण तसेच संस्कार भारतीच्या कोकण प्रांत उपाध्यक्ष सुनिता खरे, रायगड विभाग प्रमुख सुलक्षणा टिळक, ओरायन मॉलचे संचालक मनन परुळेकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पनवेलच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गोष्टीबद्दल आपल्या सर्वाना अभिमान आहे. त्याचप्रमाणे एक अभिमानाची बाब म्हणून आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती दृष्टीक्षेपात आली आहे. कोविडच्या दुःख काळानंतर विविध सण साजरे करायला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्वात मोठा सण दिवाळी साजरा होत असताना संस्कार भारती व ओरायन मॉलच्यावतीने आयएनएस विक्रांत प्रतिकृती लोकांच्या हृदयात सामवण्यासाठी प्रदर्शनाच्या रुपात मांडण्यात आली. आणि त्याला पनवेलकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंत्रालयात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं येत असतात आणि वर्षभर त्या ठिकाणी वर्दळ असते, त्या अनुषंगाने हि माहिती फक्त पनवेल पुरती मर्यादित न ठेवता त्याची महाराष्ट्रभर माहिती व्हावी, त्याकरिता महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या मंत्रालयात हे प्रदर्शन भरविले जाणार आहे, अशी माहिती देऊन पनवेलमध्ये जन्म झालेली आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्रभर पोहोचणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना माहिती देताना अधोरेखित केले. 
        संस्कार भारतीचे महामंत्री अँड. अमित चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले कि, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती विचार रुजविण्याच्या दृष्टिकोनातून संस्कार भारती काम करत असते. आयएनएस विक्रांत हे आताचे जहाज भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणारी आहे. देशाची पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. याची माहिती सर्वांना पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि पुढाकार लाभला आणि त्याचबरोबरीने ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांचे पाठबळ लाभले. आणि त्या अनुषंगाने पहिले प्रदर्शन ओरायन मॉल मध्ये यशस्वीरीत्या पार पडले. या जहाजाची प्रतिकृती संस्कार भारतीच्या चित्रविद्या विभागाचे प्रमुख सिद्धार्थ साठे यांनी अवघ्या १२ दिवसात भव्य स्वरूपात आणि बारकाईने सर्व बाबी समाविष्ट करून साकारली असून या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळेल.  
 
कोट- 
२०२२ च्या दिपावलीमध्ये आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती ओरायन मॉल मध्ये प्रदर्शन रूपात दाखल झाली होती. त्या प्रदर्शनाचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले होते. उदंड प्रतिसाद या शिबिराला मिळाला होता. त्या अनुषंगाने मंत्रालयात होणाऱ्या प्रदर्शनाने महाराष्ट्रात प्रतिकृतीची प्रचिती होईल. - मंगेश परुळेकर, ओरायन मॉल
Comments