सुतिकागृह मॅटर्निटी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आधुनिक सोयी सुविधायुक्त नागरिकांच्या सेवेत - विजय लोखंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती...
विजय लोखंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती..  

पनवेल वैभव / दि.०९ (वार्ताहर) : पनवेलमधील सर्व थरातील लोकांना माफक दरात सर्व प्रकारच्या आरोग्याबाबत स्वच्छ व रोगरहीत वातावरणांत उपचार देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, त्या अनुषंगाने पनवेल मॅटर्निटी अॅण्ड इनफंट वेल्फेअर लिगचे सुतिकागृह मॅटर्निटी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत नव्याने दमाने आणि आधुनिक सोयी सुविधायुक्त कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत पनवेल मॅटर्निटी अॅण्ड इनफंट वेल्फेअर लिगचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी दिली. पनवेलमधील रुग्ण उपचारासाठी बाहेर जाऊ नये, हा मानस आमचा आहे, त्या अनुषंगाने उपचार पद्धती, चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. 
            सुतिकागृह मॅटर्निटी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष शिरीष राजे, खजिनदार विजय देशमुख, सचिव दीप लोखंडे, सुरेंद्र परमार, सदस्य कल्पना लोखंडे, डॉ. खोत, स्नेहा राजे, वंदना देशमुख, डॉ. अंजली लामतुरे, डॉ. बालाजी जाधव, डॉ. सुजाता गायकवाड, सिद्धी लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी विजय लोखंडे यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, पनवेल शहरात १९२४ साली समाजसेवक, व्यापारी, उद्योजक व जमिनदार यांचे संकल्पनेतून व कै. डॉ. रा. धो. पटवर्धन यांचे प्रेरणेमुळे स्थापन झालेली Panvel Maternity & Infant Welfare League म्हणजेच पनवेल माता बाल संगोपन केन्द्र. त्या काळात पनवेल व आजूबाजूचे परिसरांत आरोग्याची प्रसूतीगृह नसल्यामुळे बहुसंख्य महिलांची घरीच प्रसूती होत होती तसेच जन्मलेल्या बाळाच्या अथवा आईच्या आरोग्याची काळजी घेणारे तज्ञ नव्हते. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण दिले जात होते. या सर्व गरजुंसाठी संस्थेने पनवेलमधील कै. डॉ.रा.धो. पटवर्धन यांचेबरोबर सल्ला मसलत करून दवाखान्याची सुरूवात केली. त्याचबरोबर कै. डॉ. रा. धो. पटवर्धन यांनी महिलांना आयांचे शिक्षण पण देण्यांस सुरुवात केली. परंतू काही कालावधि नंतर संस्था चालकांनी प्रसुतीगृह बांधण्याचे ठरवले व त्यामुळे सन १९२८ साली Panvel Maternity & Infant Welfare League ( पनवेल माता बाल संगोपन केन्द्र) ही संस्था सोसायटीज अॅक्टखाली नोंदणीकृत करण्यांत आली व त्यास नोंदणी क्रमांक E-12 मिळाला. संस्थेचे प्रथम अध्यक्ष म्हणून कै. श्री रामचंद्र पुराणिक, उपाध्यक्ष कै. आत्मारामशेठ आटवणे व सेक्रेटरी कै. डॉ. रा. धो. पटवर्धन हे पदाधिकारी म्हणून व १२ सभासद इतर मिळून कार्यकारी मंडळ सज्ज झाले. त्यानंतर संस्थेचे स्वतःचे मालकीची जागा घेण्यासाठी सन १९३० साली पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्यांच्या स्वतःचे वर्गणीतून खरेदी केली. सदर प्रसुतीगृह इमारत पूर्ण झाली व त्यामध्ये ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, बाहय रूग्णांसाठी रूम, २ स्पेशल रूम व १८ खाटांचे जनरल वॉर्ड आर.एम.ओ. व ऑफिससाठी व्यवस्था व आर. एम. ओ. ला राहण्याची व्यवस्था पण होती. तसेच ३ नर्स कॉटर्स रूम पण होत्या. परंतू काही वर्षानंतर बिल्डिंगची पडझड झाल्यामुळे व रस्ता रूंदी करणामध्ये इमारतीचा काही भाग तोडला गेल्यामुळे आर.एम.ओ. व नर्सेस क्वाटर्स चा वापर करणे थांबले. सदर इमारतीमध्ये सन २०१२-१३ पर्यंत रुग्णांचे सेवा करण्याचे व्रत कायम ठेवले. तद्नंतर इमारतीस वाळवी लागल्यामुळे व इमारत मोडकळीस आल्यामुळे अध्यक्ष श्री विजय लोखंडे व कार्यकारी मंडळाने निर्णय घेऊन इमारत पूर्णपणे पाडण्याचे ठरवले व या जागेमध्ये पुन्हा नव्याने अत्याधुनिक हॉस्पिटल उभे करण्याचे ठरले. नविन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध नसलेमुळे योग्य अशा विकासकाचे सहकार्याने इमारत बांधण्याचे ठरले व सर्व सभासदांचे सहमतीने दैनिक वृत्तपत्राच्या जाहिरातीद्वारे विकासकांकडून निविदा मागवल्या. सदर निविदांमध्ये मे.ई.व्ही. होम्स प्रा.लि. या विकासकांनी स्वतःकडे फक्त ३०% विकसीत जागेची मागणी केली. हा सर्व व्यवहार मा. धर्मादाय आयुक्त यांचे आदेशाने संपन्न झाला. आज विकसीत झालेली इमारत ७ मजल्यांची असून तळमजल्यावर दुकानांचे गाळे आहेत व संस्थेच्या हॉस्पिटलसाठी प्रशस्थ असे प्रवेशद्वार तसेच तळमजल्यावर तातडीचे रुग्णांचे तपासणीसाठी रूम असून डॉक्टर संस्थेचा स्टाफ ऑफिसची जागा, पॅथॉलॉजिसाठी जागा व औषध विक्रिसाठी जागा आहे. त्याचप्रमाणे वरील मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट व जिन्याची सोय आहे. या नव्या विकसीत वास्तूमधील ५ व ६ व्या मजल्यावर दोन ऑपरेशन थिएटर व आयसीयूसाठी योग्य व्यवस्था तसेच पेशंटच्या राहण्यासाठी स्पेशलरूम व जनरल वॉर्ड अशी रचना केली असून सदर दोन्ही मजले भाडयाने वैद्यकीय व्यवसायास देण्याचे ठरले, व त्या उत्पन्नातून संस्थेस सुतिकागृह हॉस्पिटल चालवण्यांस मदत होणार असल्यामुळे त्याप्रमाणे वृत्तपत्रात जाहीरात देऊन सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला जागा ५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यांत आली. सुश्रुषा हे हॉस्पिटल आज कार्यरत आहे. या नविन वास्तूमधील तळमजला, दुसरा मजला, तिसरा मजला व चौथा मजला हा संस्थेच्या ताब्यात असून त्यामध्ये आता पून्हाः सुतिकागृहाची सुरूवात, सुतिकागृह मॅटर्निटी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या नांवाने करत असून, डॉ. श्री बालाजी जाधव, डॉ. कु. अंजली लामतुरे व डॉ. सुजाता गायकवाड यांचे देखरेखी खाली सुरू करत आहोत. या भव्य वास्तुमध्ये पनवेलमधील व परिसरातील नागरिकांचे आरोग्याबाबत व रोगांवर उपचार करणेसाठी हे ५० बेडसचे हॉस्पिटल ना नफा ना तोटा या भावनेतून व शासकीय योजना राबवण्यासाठी कटीबध्द असून त्यासाठी सेवा देण्यांस सज्ज आहोत. Maternity (प्रसुतिगृह) High risk pregnancies, Accident trauma case Centre, Medical & Surgical ICU, NICU, General & Laparoscopic Surgeries, Gastroenterology, Urology सारख्या सुपरस्पेशालिटी सर्व्हिसेस उपलब्ध केल्या आहेत. तसेच जनरल वॉर्ड व स्पेशल रूम्सची व्यवस्था आहे व भविष्यात IVF Centre, टेस्टट्युब बेबी या सारख्या अद्यावत सुविधा माफक दरात देण्यात येणार असल्याचीही माहितीही विजय लोखंडे यांनी यावेळी दिली.  

चौकट - दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मधुमेह आजार संदर्भात तर तिसऱ्या बुधवारी हृदय विकारासंदर्भात शिबीर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये मोफत मार्गदर्शन आणि काही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फोटो : सुतिकागृह मॅटर्निटी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची माहिती देताना विजय लोखंडे (छाया : संजय कदम)
Comments