वाहतूकीचे नियम पाळत सौजन्याने वागणेही महत्वाचे : प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे..

महिला रिक्षा चालकांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन...
प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व अबोली महिला रिक्षा सघटनेचा संयुक्त उपक्रम...

पनवेल/प्रतिनिधी
आपले सर्व सण हे प्रतिकात्मक असे सण असतात. मकर संक्रांतीला तीळगूळ देवून गोड बोलण्याचा आग्रह केला जातो. म्हणजेच हा सण सौजन्याचे प्रतिक आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळत असतानाच प्रवाशांशी सौजन्याने वागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी केले. ते प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व अबोली महिला रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते. नवीन पनवेल सेक्टर 5 येथील डी मार्टच्या बाजूच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते, पोलीस निरिक्षक चंद्रकांत माने, अबोली महिला रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्षा सुलोचना भगत, शालिनी गुरव, सचिव संतोष सुतार, खजिनदार ललिता राऊत, सहसचिव सुनीता जाधव, माझे पनवेलचे संपादक विशाल सावंत आदींसह अबोली रिक्षा चालक महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 
प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे पुढे म्हणाले की, प्रवाशांशीच नव्हे तर अन्य चालकांशीही सौजन्याने वागणे गरजेचे आहे. आपण ज्या प्रकारे रस्त्यावर वागतो तशीच आपली प्रतिमा जनमानसात तयार होत असते. त्यामुळे आपली जनमानसातली प्रतिमा चांगली राहण्यासाठी कायमच सौजन्याने वागणे गरजेचे आहे. आज या दिवशी आपण जर प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचा निश्‍चय केला तर आजचा हा कार्यक्रम खर्‍या अर्थाने सार्थक झाल्यासारखे होईल. रिक्षा चालक उध्दट वागल्याच्या अनेकवेळा बातम्या येतात ही एक बाजू झाली तर दुसर्‍या बाजूला प्रामाणिक रिक्षा चालकांनी मौल्यवान वस्तू परत केल्याच्याही बातम्या येतात. वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघात टळू शकतात त्यामुळे वाहतूकीचे नियम पाळण्याचा संकल्प सर्वांनी करु या असे सांगत त्यांनी शेवटी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी सांगितले की महिला या संसाराच्या गाडयाचे सारथ्य करत असतात. ज्या सावधगिरीने संसाराचे सारथ्य महिला करतात त्याच सावधगिरीने रिक्षा चालवाव्यात जेणेकरुन अपघात विरहित प्रवास सुखकर प्रवास होवू शकतो. महिला आत घराबाहेर पडू लागल्या आहेत. महिलांनी अधिक जबाबदार्‍या घेतल्या पाहिजेत. गाडी हे एक यंत्र असते त्याला आपण मंत्राने नियंत्रित करु शकत नाही तर ते तंत्रानेच नियंत्रित होवू शकते. तंत्राने गाडी चालविल्यास अपघात टळू शकतात. त्यामुळे वाहतूकीचे सर्व नियम पाळत सर्व महिलांनी रिक्षा व्यवसाय करावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलतर्फे वाहतूकीचे नियम व सूचना असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, त्यांच्या पत्नी व स्नुषा मिताली देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डी मार्ट येथून रिक्षाची रॅली काढण्यात आली. नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळ ज्या चालकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते अशा वाहनचालकांना थांबवून त्यांना गुलाबपुष्प व तीळगूळ वाटप करण्यात आले. तसेच सीटबेल्ट न लावलेल्या चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांनाही पुष्पगुच्छ व तीळगूळाचे वाटप करत वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर ही रॅली कामोठे मार्ग मानसरोवर येथे जावून संपली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संतोष सुतार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील, हरिश दिवकर व प्रविण धुरत यांनी मेहनत घेतली.
Comments